पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी किरण गोसावी याने प्रसिद्ध केला एक व्हिडीओ


पुणे – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी अटकेत आहे. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली, तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर तो आर्यन खानसोबत सेल्फी काढल्यामुळेही चर्चेत होता. क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे.

दरम्यान किरण गोसावी याने पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये त्याने आपल्याविरोधात आरोप करणाऱ्या अंगरक्षक प्रभाकर साईलची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्याने सत्ताधारी किंवा विरोधातील नेत्याने आपल्या पाठीशी उभे राहावे, असेही म्हटले आहे. प्रभाकर साईलविषयी मी काही बोलू इच्छितो. सॅम डिसूझासोबत कोणाचे संभाषण झाले? किती पैसे कोणी घेतले? गेल्या पाच दिवसांत प्रभाकर साईलला काय ऑफर आल्या आहेत? हे त्याच्या मोबाइलमधून स्पष्टपणे समजेल. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल संभाषण काढावे, अशी मागणी किरण गोसावीने केली आहे.

प्रभाकरसोबत मी इथून तिथून पैसे आणण्यासोबत बोललो असेल, तर माझे मोबाइल चॅट्स काढा. माझा आयात निर्यातीचा व्यवसाय आहे. त्यामध्ये पूर्वीच्या काही चॅट्स असतील, ज्यामध्ये व्यवसायातील पैशांची देवाण-घेवाण याबद्दल चर्चा असायची, तिथे मी त्याला पाठवायचो. पण २ तारखेनंतरचे त्याचे चॅट्स पाहावेत आणि डिलीट केलेले मेसेजही काढावेत एवढी विनंती असल्याचेही त्याने म्हटले आहे.

ही केस मुंबई पोलिसांनी हाती घेतली, तर सर्वात प्रथम याची माहिती काढावी. मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे आहेत त्या सर्वांची माहिती काढावी. मी मराठी असल्यामुळे माझ्या मागे कोणीतरी उभे राहावे. सत्तेतील असोत किंवा विरोधातील… एकाने तरी माझ्या पाठी उभे राहून मी सांगत आहे, तितक्या गोष्टींसाठी मुंबई पोलिसांकडे विनंती करावी, असे त्याने म्हटले आहे. प्रभाकर साईलचे फोन रेकॉर्ड काढा, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, जे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहेत. यांनीच पैसे घेतले असून साईल आणि त्याचे दोन भाऊ यात सहभागी असल्याचा आरोप किरण गोसावीने केला आहे.