भरसभेत अमोल मिटकरींचा वादग्रस्त सल्ला ; पैसे कोणाचेही घ्या, पण मतदान महाविकास आघाडीला करा


देगलूर – आगामी लक्ष्मीपूजनाचा आधार घेत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. पैसे कोणाचेही घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे. अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत केले आहे.

जी चूक मतदार राजाकडून पंढरपूरमध्ये घडली, माझी येथील मतदारांना विनंती आहे ही चूक घडू देऊ नका. तुमचे मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक एक कार्यालय ३० हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपचा पैसा घ्यायचा, पण महाविकास आघाडीला मतदान करायचे, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याआधी मतदारांना अजब ऑफर दिली होती. भाजपला ज्या गावात एकूण मतदानाच्या ७० टक्के मते मिळतील, तिथे माझ्याकडून गावजेवण घातले जाईल, असे पाटील म्हणाले होते. त्यासोबतच, ज्या प्रभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, तेथील अध्यक्षांना विशेष बक्षीस देखील दिले जाईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. विशेषत: या सर्व गावांमध्ये गावजेवणाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते.

३० ऑक्टोबर रोजी नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.

२००९च्या निवडणुकांमध्ये नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत येथील मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपले मत टाकले. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९मध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. मात्र, त्यांच्या निधनानंतर तिथे पुन्हा निवडणुका लागल्या आहेत.