कर्नाटकात निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण


बंगळुरु – कोरोनामुळे पुन्हा एकदा कर्नाटकची चिंता वाढवली आहे. कोडगू जिल्ह्यातील निवासी शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० मुली आणि २२ मुलांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची एका आठवड्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी नववी ते १२ वीच्या वर्गातील आहेत.

ही घटना जवाहर नवोदय विद्यालयात घडली आहे. शाळेतील १० विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असून २२ विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाही आहेत. दरम्यान एका कर्मचाऱ्यालाही लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. दरम्यान या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकूण २७० विद्यार्थी शाळेत असून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. एनडीटीव्हीशी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून चिंता करण्याचे काही कारण नाही. शाळेच्या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून इतर सर्व काळजीही घेतली जात आहे. दरम्यान यामुळे शाळेचे टाइमटेबल बिघडले असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. घटनेची माहिती मिळातच जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी यांनी शाळेला भेट दिली. दरम्यान कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी शाळेत कोरोना नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.