दुनियेतील पहिल्या पोस्टल तिकिटाचा होणार लिलाव

जुनी नाणी, जुन्या नोटा यांचे लिलाव सरार्स होत असतात. जुनी नाणी, नोटा संग्राहक जगात मोठ्या संखेने आहेत त्याचप्रमाणे पोस्टाची जुनी तिकिटे संग्रही ठेवणारे लोक सुद्धा खूप आहेत. हे लोक जेथून जेथून जुनी तिकिटे मिळतील तेथून मिळवून आपल्या संग्रही ठेवतात, त्यासाठी अनेकदा मोठी रक्कम सुद्धा मोजली जाते. या लोकासाठी एक खास बातमी आहे. दुनियेतील सर्वात जुने पोस्ट तिकीट लिलावात ठेवले जात असून या तिकिटाला किमान ६२ कोटींची किंमत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पेनी ब्लॅक नावाचे हे तिकीट किंवा स्टँपचा वापर १८४० म्हणजे १८१ वर्षापूर्वी प्रथम केला गेला होता. हे तिकीट एका पत्रावर चिकटवले गेले होते. जगात आत्तापर्यंत मिळालेल्या तिकिटात हे सर्वात जुने असून त्यावर व्हिक्टोरिया राणीची प्रतिमा आहे. ज्या कागदावरून ते मिळाले त्यावर १० एप्रिल १८४० अशी तारीख आहे. स्कॉटलंडच्या एका राजकीय व्यक्तीच्या जवळ जी कागदपत्रे होती त्यातील एका पत्रावर हे तिकीट होते.

असे सांगितले जाते की जगात ब्लॅक पेनीचे तीन स्टँप बनविले गेले होती. त्यातील हा एक असून सोथबे तर्फे त्याचा लिलाव केला जात आहे. सोथबे ट्रेझर सेल प्रमुख हेन्री हाउस यांच्या म्हणण्यानुसार इतका दीर्घ काळ जतन केलेले हे पहिलेच तिकीट असावे. इतक्या जुन्या तिकीटाची खरेदी जगातील प्रसिद्ध व्यक्तीच करू शकतात. या तिकिटावर तीन वर्षे रिसर्च केल्यावरच त्याच्या खरेपणाची खात्री पटली आहे. या तिकिटाचा लिलाव ७ डिसेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी व्हिक्टोरिया राणीचे स्केच असलेली ६८ दशलक्ष तिकिटे लिलावात विकली गेली आहेत. आता हे दुर्मिळ तिकीट त्यामुळेच चर्चेत आले आहे.