जुनी कार विकताय, मग फास्टटॅग बाबत घ्या ही काळजी
दिवाळी अगदी तोंडावर आली असल्याने अनेकांनी नवी कार विकत घेण्याचे बेत आखले आहेत. अनेकांना जुनी कार विकून नवी घ्यायची असेल. अश्या ग्राहकांनी जुनी कार विकताना एक सावधगिरी बाळगायला हवी आणि ती आहे फास्टटॅग बद्दल. केंद्र सरकारने महामार्गांवर टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगा कमी कराव्या यासाठी सर्व चार चाकी वाहनांना फास्टटॅग अनिवार्य केला आहे. नवी गाडी खरेदी करताना फास्टटॅग खरेदी करणे बंधनकारक आहेच पण जुनी गाडी विकणार असाल तर त्या गाडीच्या फास्टटॅगचे काय करायचे याची माहिती अनेकांना नाही.
जुनी गाडी विकताना तुम्ही ज्या बँकेकडून फास्टटॅग खरेदी केला आहे त्या बँकेला तशी सूचना देऊन आपले फास्टटॅगशी सलग्न खाते बंद करण्याची सूचना देणे महत्वाचे आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर त्या संदर्भात सर्व माहिती दिली गेली आहे. फास्टटॅग हे एक खास स्टीकर असून हे गाडीच्या पुढच्या काचेवर लावले जाते. हायवेवर प्रवास करताना टोल नाक्यावर स्कॅनरच्या मदतीने रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफीकेशन तंत्राने ते स्कॅन केले जाते आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या ज्या अकौंटला फास्टटॅग लिंक्ड केला आहे त्यातून टोलचे पैसे कापले जातात.
त्यामुळे तुम्ही तुमची गाडी विकणार असला तर प्रथम हे अकौंट डीअॅक्टीव्हेट करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या अकौंट मधून टोलचे पैसे कापले जात राहतातच पण तुमची गाडी घेणाऱ्या व्यक्तीला नवा फास्टटॅग खरेदी करता येत नाही. कारण एका वाहनासाठी एकच फास्टटॅग खरेदी करता येतो. तुमचे फास्टटॅग रिलेटेड अकौंट डीअॅक्टीव्हेट करणे सोपे आहे.
त्यासाठी बकेच्या कस्टमर केअर सपोर्टशी संपर्क साधून लिंक्ड अकौंट बंद करण्याची सूचना देता येते. फास्टटॅग संदर्भातील तक्रारीसाठी १०३३ हा हेल्पलाईन नंबर असून तेथे संपर्क साधल्यास तुमच्या समस्येचे उत्तर मिळते. फास्टटॅग लिंक्ड मोबाईल पेमेंट अॅपचा वापर सुद्धा त्यासाठी करता येतो.