अर्थ मंत्रालयाच्या सर्व सरकारी विभागांना सूचना, एअर इंडिया तिकिटावरील सुविधा रद्द
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या सर्व विभागांना एअर इंडिया विमान कंपनीची मागची सर्व देणी चुकती करण्याचे आदेश जारी केले असून यापुढे एअर इंडिया विमान कंपनीच्या तिकिटांवर क्रेडीट सुविधा बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या सर्व विभागांना तिकीट खरेदी करताना तिकिटाचे पैसे भरल्यावरच तिकीट घेता येणार आहे.
या संदर्भात एक मेमोरँडम अर्थ मंत्रालयाने जारी केला आहे. त्यात सरकारने एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेस मधील स्वतःचा सर्व हिस्सा टाटा सन्सला विकला असल्याचे नमूद केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एअर इंडियाची पूर्ण मालकी टाटा सन्स कडे येणार आहे. त्यामुळे सर्व सरकारी विभागांना तिकीट खरेदीवर आजपर्यंत दिली जात असलेली क्रेडीट सुविधा बंद केली गेल्याचे म्हटले गेले आहे. ही सुविधा २००९ पासून देण्यात येत होती. त्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवास सरकारी खर्चाने होत असे आणि त्याचे पैसे नंतर दिले जात असत. हे देणे अनेक वर्षे थकविल्यामुळे एअर इंडियाचे नुकसान आणि तोटा वाढत गेला होता.
नव्या आदेशानुसार आता ही उधारी बंद केली गेली आहे. त्यामुळे सरकारी विभाग आणि सरकारी कर्मचारी यांना पैसे मोजून यापुढे तिकीट खरेदी करता येईल. २५ ऑक्टोबर रोजी एअर इंडिया विक्री करारावर सह्या झाल्या असून लिलावात टाटा सन्सने बेसिक २७०० कोटी रोख आणि एअरलाईन्सचे १५३०० कोटींचे कर्ज याची जबाबदारी घेतली आहे.