देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सैनिकांसोबत – भगत सिंह कोश्यारी


मुंबई : देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सैनिकांसोबत आहे. ज्या सैनिकांनी देश सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिले ते व्यर्थ जाणार नाही, असे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने सुदर्शन भारत परिक्रमा व ब्लॅक कॅट कार रॅलीचे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आले होते. या कार रॅलीला कोश्यारी यांनी झेंडा दाखविला. यावेळी एनएसजीचे महानिरीक्षक अभिषेक त्रिवेदी, कार रॅलीचे प्रमुख कर्नल उमेदसिंग राठोड, 26 स्पेशल कॉम्पॅजिट ग्रुपचे ग्रुप कमांडर कर्नल नितेश कुमार यांच्यासह एनएसजीचे जवान उपस्थित होते.

ब्लॅक कॅट कार रॅली 2 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्ली येथून सुरुवात होऊन सुवर्ण चतुष्कोन क्षेत्रात प्रवास करुन मुंबई येथे दाखल झाली आहे. या रॅलीचा समारोप 30 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथेच होणार आहे. या रॅलीचा उद्देश ऐतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक स्थळ आदी ठिकाणांना भेटी देऊन देशभक्ती व एकता जागृत करणे असा आहे.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यात सशस्त्र सेना दलाने अभूतपूर्व योगदान दिले आहे. देशात एकता रहावी व देशातील नागरिक सुरक्षित रहावे यासाठी आपल्या जवानांचे मोलाचे योगदान आहे. देशाला सुरक्षित, मजबूत आणि दृढ ठेवण्याचे काम आपले जवान करीत आहेत. ज्या जवानांनी देशासाठी बलिदान देऊन देश सुरक्षित ठेवला त्यांना मी नमन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी बलिदान दिले त्यामुळे आपला देश स्वातंत्र झाला. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

देशाच्या एैक्यासाठी देशातील समाजसेवक, व्यापारी, शेतकरी, मजूर, विविध संस्था व विविध क्षेत्रांचे योगदान राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक थोर नेत्यांची देशाची एकता व अखंडता राखण्यात महत्वाची भूमिका होती. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन करुन देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून एकता स्थापित करण्याच्या दृष्टीने दिलेला संदेश स्तुत्य आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हे वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे कोश्यारी सांगितले. सशस्त्र सेना दलातील खेळाडू कर्नम मल्लेश्वरी, डॉ.दीपा मलिक, योगेश कटोनिया, अर्जुनलाल जाट, नायक सुभेदार अरविंद सिंग, समिथ एस., निलेश कुलकर्णी, श्रीमती अपुर्वा चंदेल, आदिल अन्सारी, प्रणव देसाई, शरद कुमार यांचा देशासाठी विविध क्षेत्रामध्ये पदक मिळविल्याबद्दल कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.