एनसीबीने चौकशी सुरू करण्याआधीच वानखेडेंच्या अडचणी वाढल्या


मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. वानखेडेंची एनसीबीकडून खाते अंतर्गत चौकशी होणार आहे. मुंबईत त्यासाठी एनसीबीचे पथक दाखल झाले आहे. पण वानखेडेंची त्याआधीच चौकशी मुंबई पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे. वानखेडेंची चौकशी सहाय्यक पोलीस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून होणार आहे. वानखेडेंना आर्यन खानच्या अटक प्रकरणात ८ कोटी रुपये मिळणार होते, असा सनसनाटी आरोप कारवाईवेळी साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांनी केला. मुंबई पोलीस या आरोपांची चौकशी करणार आहेत.

समीर वानखेडेंवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप होत आहेत. दररोज पत्रकार परिषद घेऊन वानखेडेंनी केलेल्या कारवाया, त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी वापरलेली कागदपत्रे याबद्दल मंत्री नवाब मलिक गंभीर आरोप करत आहेत. मुंबई पोलिसांनी याची चौकशी करण्यासाठी एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. वानखेडे यांच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व तक्रारींची चौकशी त्यांच्याकडून केली जाणार आहे. मुंबईतील चार पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.

समीर वानखेडेंसह इतरांवर क्रूझवरील कारवाईवेळी उपस्थित असलेले पंच प्रभाकर साईल यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी त्याचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. प्रभाकर साईल यांचा जबाब मंगळवारी रात्री कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आला. प्रभाकर यांचा जबाब डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने नोंदवून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सध्या मुंबई पोलीस इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा तपास करत आहेत.

आपल्या जबाबामध्ये प्रभाकर साईल यांनी काही व्यक्तींची नावे आणि ठिकाणांचा उल्लेख केला आहे. त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन ते तपासले जातील. याशिवाय प्रभाकर यांच्या फोनचे लोकेशन तपासले जातील. प्रभाकर यांनी पैशांच्या व्यवहारांचा उल्लेख केला आहे. या व्यवहाराबद्दल ज्या ठिकाणी चर्चा झाली, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जातील. यानंतर प्राथमिक अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.