समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – यशोमती ठाकूर


मुंबई : समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मागण्या संदर्भात उच्चस्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच निवृत्‍तीवेतनधारकांना त्यांचे निवृत्तीवेतन कोषागार कार्यालयातून मिळण्याच्या दृष्टीने तातडीने प्रस्ताव तयार करण्यात यावा. बोर्डाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात आढावा बैठक घ्यावी, असे निर्देशही ॲड.ठाकूर यांनी दिले.

बैठकीस समाज कल्याण बोर्डाचे सचिव सुधाकर डगावकर, महिला व बाल विकास विभागाचे अवर सचिव महेश वरुडकर, उपायुक्त (प्रशासन) बी.एल. मुंढे, तसेच सेवानिवृत्त वेतनधरक कर्मचारी उपस्थित होते.