उल्हासनगरमध्ये ओमी कलानी गटाच्या २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


उल्हासनगर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवारी उल्हासनगर शहरात आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ‘कलानी महल’ येथे पप्पू कलानी याची भेट घेतल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. भाजपच्या चिन्हावर गेल्या निवडणुकीत निवडून आलेले उल्हासनगर महापालिकेतील २२ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे कलानी कुटुंबात कुणीही नव्हते. त्यामुळे भाजपपासून दुरावलेल्या ओमी कलानी आणि पूर्वाश्रमीच्या पप्पू कलानीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचे दिसत होते. भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्याशी पप्पू कलानीने पंधरा दिवसांपूर्वी चर्चा केली होती. आयलानी यांनी याच वेळी भाजप प्रवेशाचे आमंत्रण दिले होते.