आर्यन खानला आज देखील दिलासा नाही


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने कॉर्डेलिया क्रुझ प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी पुन्हा एकदा पुढची तारीख दिल्यामुळे आर्यन खानसह इतर आरोपींना आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागेल. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी अरबाज मर्चंटसाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. पण, या युक्तीवादाला अधिक वेळ लागल्यामुळे न्यायालयाने जामीनावर उद्या पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला.

एनसीबीवर या सुनावणीत प्रश्नांचा भडीमार झाला आहे. ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी हे प्रकरण कोणत्याही षडयंत्राचे नसून व्यक्तिगत सेवनाच्या आरोपांचे असल्याचे म्हटले आहे. अटकेच्या मेमोत देखील तसेच म्हटल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच जर ड्रग्ज सेवन झाले होते, तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न एनसीबीला विचारला.

ज्येष्ठ वकील अमित देसाई या सुनावणीत अरबाज मर्चंटसाठी युक्तीवाद करताना म्हणाले, मी अटकेच्या मुद्द्यावर काल बोललो आणि अटकेचा मेमो वाचून दाखवला. ३ ऑक्टोबर रोजी या तिन्ही आरोपींना एकसारख्याच गुन्ह्यांसाठी अटक केली. त्यावेळी कलम २७ (अ) आणि २९ लावण्यात आले नव्हते. त्यांना केवळ कलम २० (ब) आणि २७ साठी अटक केली होती. या सर्व गोष्टींचा असा अर्थ निघतो की हे तिघे तेथे केवळ ड्रग्ज सेवन करण्यासाठी आले होते. अटकेच्या मेमोत देखील तसेच म्हटले आहे.

जामीन मिळणे हा कायदा आणि नियम आहे, तर तुरूंग हा अपवाद आहे. पण, सध्या अटक करणे नियम आणि जामीन अपवाद झाला आहे. कोणतेही षडयंत्र या प्रकरणात नव्हते. ही केवळ व्यक्तिगत कृती असताना अटकेची काय गरज होती? दुपारी २ वाजता त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री ७ वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. कोठडी मागताना देखील षडयंत्र असल्याचा काहीही उल्लेख तेव्हा नव्हता. नंतर हे ८ लोकांचे षडयंत्र असल्याचा दावा करण्यात आला आणि आता २० लोकांचं षडयंत्र असल्याचा दावा केला जात असल्याचेही अमित देसाई यांनी सांगितले.

एनसीबीच्या मागणीनुसार न्यायालयाने आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली. पण, आजपर्यंत षडयंत्र केल्याप्रकरणी एकालाही अटक करण्यात आलेली नाही. षडयंत्र हा एक स्वतंत्र गुन्हा आहे. पंचनाम्यात देखील हे प्रकरण केवळ व्यक्तिगत ड्रग्ज सेवनाचे असल्याचे म्हटले आहे. अटकेच्या मेमोत देखील व्यक्तिगत सेवनाचाच आरोप आहे.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली. अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. पण, न्यायालयाचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर यावर बुधवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी सुनावणी ठेवण्यात आली होती.