कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नियुक्ती


ओटावा – कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी भारतीय वंशाच्या कॅनडाच्या नेत्या अनिता आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी अनिता आनंद यांना देण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर आनंद यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी जस्टिन ट्रूडो यांचा लिबरल पक्ष सरकारमध्ये आला आहे. पंतप्रधानपदी दीर्घकाळ राहणाऱ्या ट्रूडो यांच्या पक्षाला बहुमत मिळू शकलेले नाही.

ट्रूडो नवीन सरकारच्या स्थापनेनंतरच संरक्षणासह काही मंत्रालयांमध्ये फेरबदल करतील अशी शक्यता होती. दरम्यान, भारतीय वंशाचे संरक्षण मंत्री हरजित सज्जन यांची जागा ५४ वर्षीय अनिता आनंद यांनी घेतली आहे. कॅनडाच्या लष्करातील लैंगिक शोषणाची प्रकरणे योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल हरजित सज्जन यांच्यावर टीका होत आहे. त्याच पार्श्वभूमिवर त्यांच्याकडून संरक्षण मंत्रीपद काढून घेण्यात आले असून त्यांना आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे मंत्री करण्यात आल्याचे वृत्त कॅनेडियन वृत्तपत्र नॅशनल पोस्टने दिले आहे.

आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे मंत्री म्हणून सज्जन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या मंत्रिमंडळात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. ग्लोबल न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ काही आठवड्यांपासून एका महिलेला संरक्षण मंत्री बनवण्यात यावे, असे सूचवत होते. जेणेकरून लष्करातील लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांना चांगला संदेश जाईल. दरम्यान, वकील असलेल्या आनंद सेनेतील अशा घटनांबाबत कठोर पावले उचलू शकतात, असे म्हटले जात आहे.

अनिता आनंद यांचे वडील तामिळनाडूचे तर आई पंजाबची होती. नोव्हा स्कॉशियाच्या केंटविले येथे अनिता आनंद यांचा जन्म झाला. तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर होते. त्यांची आई सरोज डी. राम भूलतज्ज्ञ होत्या, तर वडील एस.व्ही. आनंद हे जनरल सर्जन होते.