एनसीबीच्या खारघरमधील कारवाईबाबत एका पंचाने केला गौप्यस्फोट


मुंबई – एनसीबीचे विभागीय संचालक आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सपाटाच लावला आहे. त्यांनी आजही पत्रकार परिषद घेत आणखी काही नवे आणि गंभीर आरोप वानखेडेंवर केले आहेत. आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियांशी समीर वानखेडे यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. आर्यन खान कारवाई प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागल आहे.

दरम्यान, एनसीबीच्या एका अन्य कारवाईबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे. हा गौप्यस्फोट एका पंचाने केला आहे. १० ते १२ कोऱ्या कागदावर खारघरमधील कारवाईच्या वेळी सह्या घेतल्याचा दावा नायजेरियन नागरिकाच्या अटकेतील कारवाईतील पंच शेखर कांबळे यांनी केला आहे. नायजेरियन नागरिकाला खारघरमध्ये अटक झाली होती. यावेळी पंच असलेले शेखर कांबळे यांनी ही माहिती एबीपी माझाला दिली आहे.

शेखर कांबळे म्हणाले, खारघरमधील केस नंबर ८०\२१ मध्ये नायजेरियन नागरिकाला पकडण्यासाठी गेलो होतो. तो तेव्हा धक्का देऊन पळून गेला. आम्ही त्यानंतर सेक्टर १२ ला गेलो. त्या ठिकाणी नायजेरियन किचन आहे. त्या किचनमध्ये ४० ते ५० नायजेरियन नागरिक होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी प्रवेश करताच ते पळू लागले. त्यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांना सहा एनसीबी अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांना घेऊन गेले. तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. त्यांना एनसीबी ऑफिसला घेऊन गेले. त्यातील एकाला सोडण्यात आले आणि एकावर ६० ग्रॅमची रिकव्हरी दाखवली. त्यानंतर मला तीन दिवसांनी ऑफिसला बोलावले आणि १० ते १२ कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या. समीर वानखेडे देखील या कारवाईत होते, मला त्यांनीच पंच होण्यास आणि सही करण्यास सांगितले. काल बाहेर आलेल्या पत्रात या केसचा उल्लेख आहे. खारघरमधील कारवाई बोगस असल्याचे पत्रात म्हटल्यामुळे मी घाबरलो आहे.