काळे पाणी  म्हणजेच सेल्युलर  जेल

गेल्या जमान्यात काळ्या पाण्याची शिक्षा हा फार अघोरी शिक्षेचा प्रकार मानला जात होता आणि या शिक्षेच्या नुसत्या उल्लेखाने कैदी गर्भगळीत होत अशी तिची ख्याती होती. वास्तविक काळे पाणी हे नाव सेल्युलर जेल साठी होते. आज जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बनलेल्या अंदमानच्या पोर्ट ब्लेअर मधील हा तुरुंग अनेक भारतीयांच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि प्रसिद्ध प्रदर्शनीय स्थळाचा विषय बनले आहे.

ब्रिटीश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्रसेनानीना कैद करून मुख्य भारतीय भूमीपासून शेकडो मैल दूर असलेल्या या एकांतजागी बांधलेल्या तुरुंगात डांबले जात असे. येथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत, जीवघेण्या शिक्षा दिल्या जात असत. काळे पाणी हा शब्द संस्कृत भाषेमधून आलेला असून काल म्हणजे मृत्यू आणि पाणी म्हणजे ते मृत्यूस्थान जेथून कुणीच जिवंत परत येऊ शकत नाही. सेल्युलर जेल हे नाव ब्रिटिशांनी दिले होते. शेकडो भारतीय स्वतंत्र सेनानीना भोगाव्या लागलेल्या अमानुष अत्याचाराचा हा मूक साक्षीदार. येथेच स्वतंत्रसेनानी वीर सावरकर यांनी शिक्षा भोगली होती.

१८९७ मध्ये या तुरुंगाचे काम सुरु झाले आणि १९०६ मध्ये तो बांधून पूर्ण झाला. येथे ६९८ कोठड्या आहेत. प्रत्येक कोठडीला साधारण १० फुट उंचीवर बारीकसा झरोका किंवा खिडकी आहे. येथे कैदी एकमेकांना भेटू शकत नसत, बोलू शकत नसत आणि एका कोठडीत एकच कैदी ठेवला जात असे. म्हणजे ही एक प्रकारे एकांतवासाची शिक्षा होती आणि त्यामुळे अनेक कैदी मानसिक दृष्ट्या कोसळून जात असत. प्रत्येक कैद्यासाठी स्वतंत्र सेल म्हणून याचे नाव सेल्युलर जेल असे ठेवले गेले होते.

विशेष म्हणजे या तुरुंगाची तटबंदी अगदी कमी उंचीची होती. पण येथून पळून जाणे फार अवघड होते कारण तटबंदी बाहेर चोहो बाजूनी दूरपर्यंत समुद्र होता आणि पळून जाणारे या समुद्रात बुडून मरत असत. या तुरुंगात अनेकांना फाशी दिली गेली तर अनेक कैदी शारीरिक यातना असह्य झाल्याने मरण पावले. पण या संदर्भात कुठलेही रेकॉर्ड नाही. यामुळेच या तुरुंगाला भारतीय इतिहासातील काळा अध्याय म्हटले जाते.