तुम्हीही खरेदी करू शकता विमान

विमान प्रवास आता सर्वसामान्य बाब बनली आहे. पण काही महत्वाकांक्षी लोकांना स्वतःचे विमान असावे असे स्वप्न असते. काही काळापूर्वी स्वतःची कार असावी असे स्वप्न पाहिले जात होते पण आता गलेलठ्ठ पगार आणि उद्योगातून मिळणारा प्रचंड पैसा यामुळे कारची स्वप्नातील जागा विमान किंवा हेलिकॉप्टर घेऊ लागले आहे. अमेरिकेसारख्या देशात आज अनेक नोकरदार स्वतःच्या विमानाने ऑफिसला येतात. भारतीयांना विमान खरेदी करणे कदाचित थोडे अवघड असेल पण अशक्य नक्कीच नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जसे होम लोन, कार लोन घेऊन घर, कार खरेदी करतो तसे लोन विमानखरेदीसाठी सुद्धा बँक देते. विमान खरेदी करण्यापूर्वी विमानाच्या किमती, विमान बनविणाऱ्या कंपन्या, विमान आकार, किती सीटर, फीचर्स सुविधा माहिती करून घेणे आवश्यक आहे. भारताचा विचार केला तर येथे बोईंग कंपनीच्या विमानांना अधिक मागणी आहे. बोईंग जगातील सर्वात मोठी आणि जगभर विमाने पुरविणारी कंपनी अमेरिकेची आहे. प्रवासी विमानांच्या मॉडेल्स नुसार विमानांच्या किमती ७७५ कोटींपासून ३ हजार कोटींपर्यंत आहेत. म्हणजे आपल्याला विमान खरेदी करायचे असेल तर हजार कोटी क्लब मध्ये अगोदर सामील होणे भाग आहे. पण हेलिकॉप्टर खरेदी करायचे असेल तर १० कोटी मध्ये काम होऊ शकते.

एरोसेल डॉट कॉमनुसार विमानाचे आयुष्य गुणवत्ता आणि क्षमेतेनुसार साधारण २० ते ३६ वर्षे तर हेलीकॉप्टरचे आयुष्य १५ ते २० वर्षे असते. विमान ठेवण्यासाठी एअरपोर्ट वर जागा बुक करावी लागते आणि पार्किंग चार्जेस भरावे लागतात. प्रवास करण्याच्या अगोदर संबंधित एअरपोर्ट ला सूचना देऊन एअर ट्राफिक कंट्रोल कडून परवानगी घ्यावी लागते. एवढे करता येणे शक्य असेल तर विमान खरेदी होऊ शकते.

आता विमान खरेदीसाठी पैसे कमी पडत असतील तर बँक त्यासाठी लोन देते. आपल्या देशातील अनेक उद्योजक, सेलेब्रिटी यांनी लोन घेऊनच विमाने किंवा हेलिकॉप्टर खरेदी केली आहेत असे समजते.