अमेरिका स्पेस मध्ये सुपरहायवे बांधण्याच्या तयारीत

अंतराळ क्षेत्रात सुसाट वेगाने विकास करत असलेल्या चीनशी टक्कर घेण्यासाठी अमेरिकन सेना सज्ज झाली आहे. अमेरिका अंतराळात म्हणजे स्पेस मध्ये सुपर हायवे बनविण्याच्या तयारीला लागली असून भविष्यात या सुपर हायवेचा वापर चंद्र आणि त्याच्या पुढचा प्रवास सहजसोपा होण्यासाठी केला जाणार आहे. मिडिया रिपोर्ट नुसार या सुपरहायवे साठी अमेरिकेने व्यावसयिक भागीदार आणि सहकारी मिळविले आहेत. भविष्यात चंद्र मोहिमा आणि अन्य अंतराळप्रवास याच सुपरहायवेवरून होऊ शकतो असे संकेत दिले गेले आहेत.

या स्पेस सुपरहायवेवर इंधन भरणे, अंतराळ यानाची दुरुस्ती, सर्व्हिसिंग, देखभाल होईल आणि जमा झालेला कचरा येथे टाकता येईल. चीन ज्या वेगाने भूभाग आणि समुद्रात अतिक्रमण करत आहे आणि विस्तारवादी धोरण राबवत आहे तेच धोरण अंतराळात वापरू पाहत आहे असा आरोप अमेरिकेकडून केला जात आहे.

अमेरिकन सेनेने चीनने अंतराळात मेगास्ट्रक्चर बनविण्यापूर्वीच सुपर हायवे तयार करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. द सनच्या एका रिपोर्ट नुसार एका सेमिनार मध्ये स्पेस फोर्स ब्रिगेडियर जनरल जॉन ऑल्सन म्हणाले अनेक देशांची धोरणे आणि त्यातही खास चीनचे धोरण लक्षात घेता हे काम आम्हाला सर्वप्रथम केले पाहिजे. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात काही मानके, सिद्धांत बनविले जातील. जगभरात आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटनांची भाषा इंग्रजी आहे आणि अंतराळात सुद्धा हीच भाषा असली पाहिजे. ती मँडरीन (चीनी भाषा) असता कामा नये.

अमेरिका आणि चीन चंद्रावर बेस बनविण्यासाठी जागेच्या शोधात आहेत आणि त्यात त्यांची चांगलीच चढाओढ सुरु झाली आहे. चीनने पृथ्वीच्या कक्षेत प्रचंड आकाराचे मेगास्ट्रक्चर उभारण्याची तयारी सुरु केली आहे. येथे सोलर पॉवर प्लांट, पर्यटकांसाठी संकुल, गॅस स्टेशन, उल्का खनन सुविधा दिल्या जाणार आहेत.चीन स्वतःचे अंतराळस्थानक बांधत असून त्याने अमेरिकेच्या नासाला आव्हान दिले आहे असे मानले जात आहे.