इन्स्टा आणि टिकटॉक सेन्सेशन ज्योतिषी कुत्रा ‘नुडल’

अमेरिकेच्या न्युयोर्क मध्ये राहणाऱ्या जोनाथन ग्रेजीआनो यांचा पाळीव पग डॉग इन्स्टाग्राम, टिकटॉकवर अतिशय लोकप्रिय आहे. सोशल मिडीयावर त्याची प्रसिद्धी भविष्यवेत्ता किंवा ज्योतिषी अशी असून ‘नुडल’ नावाचा हा कुत्रा १३ वर्षांचा आहे.

भविष्यावर किती लोक विश्वास ठेवतात हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण आज वर्तमानपत्रे किंवा ऑनलाईन वृत्तपत्रे यातील बातम्या किती लोक पाहतात याचा आढावा घेतला आणि सर्वाधिक वाचला जाणारा रकाना कोणता याचा शोध घेतला तर असे दिसते कि दैनिक भविष्य किंवा आजचा दिवस या नावाखाली दिले जाणारे भविष्य हा सर्वाधिक वाचला जाणारा रकाना आहे. बरेचसे वाचक वर्तमानपत्र हातात पडले कि स्वतःच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे वाचतात. नुडल पग हेच काम वाचकांसाठी करतो.

आता त्याने काही भविष्यशास्त्राचा अभ्यास वगैरे केलेला नाही. त्याच्या भविष्य वर्तविण्याचा अर्थ जोनाथन या त्याच्या मालकानेच लावला आहे. जोनाथन सकाळी नुडलला झोपेतून उठवितो आणि उठल्यावर नुडल पहिली कृती कोणती करतो यावरून आजचा दिवस कसा असेल याचा अंदाज बांधतो. विशेष म्हणजे हे भविष्य सर्व राशीच्या लोकांसाठी एकसारखे असते. म्हणजे समजा नुडल झोपेतून उठल्यावर पुन्हा झोपला तर तो दिवस जोनाथन ‘ नो बोन डे’ म्हणून जाहीर करतो. याचा अर्थ आज दिवसभर सावधानता बाळगा, भांडण नको, कामाशी काम असे वागा असा असतो.

नुडल झोपेतून उठल्यावर बसला किंवा चालू लागला तर तो दिवस जोनाथन ‘बोन डे’ म्हणून जाहीर करतो. म्हणजे आजचा दिवस चांगला, अडलेली कामे पूर्ण होतील असा घ्यायचा. यासाठी नुडलचे रोजचे व्हिडीओ किंवा फोटो जोनाथन शेअर करतो. हजारो युजर्स नुडलला फॉलो करतात आणि त्याने संकेत दिलेले भविष्य खरे ठरते आहे हे पाहून आश्चर्यचकित होतात असे समजते. नुडलचे रोज इन्स्टा आणि टिकटॉकवर व्हिडीओ, फोटो शेअर होत असल्याने आणि त्याला प्रचंड संखेने फॉलोअर्स असल्याने नुडल सोशल मिडिया सेन्सेशन बनला आहे.