भारतात इलेक्ट्रिक वाहनांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असले तरी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर ही मोठी समस्या सध्या देशासमोर आहे. अर्थात ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरु झाले असून टाटा पॉवरने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार त्यांनी देशभरात १००० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स सुरु केली आहेत. टाटा पॉवरने ग्राहक कार्यालये, मॉल, हॉटेल्स, रिटेल दुकाने आणि सार्वजनिक जागी अशी स्टेशन उभारली आहेत. शिवाय १० हजार घरगुती ईव्ही चार्जिंग पॉइंट दिले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन मालकांना इव्ही चार्जिंग सुविधा मिळत आहे.
टाटा पॉवरने देशात सुरु केली १ हजार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स
टाटा पॉवर ईझेड चार्जर्स इको सिस्टीम, सार्वजनिक, कॅप्टीव्ह, बस फ्लीट व होम चार्जर्सची संपूर्ण रेंज कव्हर करत असून सर्वप्रथम कंपनीने मुंबईत चार्जर्स लावणे सुरु केले होते. त्यानंतर आता देशातील १८० शहरात ही योजना राबविली जात असून त्या अंतर्गत १० हजार चार्जिंग स्टेशन्स देशातील राज्यमार्ग ई हायवे बनविण्यासाठी सक्षम केले जात आहेत.
यासाठी कंपनीने एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म व मोबाईल आधारित अॅप जारी केले असून ते ईझेड चार्ज नावाने ओळखले जाते. त्यावरून चार्जिंग स्टेशनचा पत्ता मिळू शकतो तसेच चार्जिंगचे ऑनलाईन बिल भरता येते. जुलै २०२१ मध्ये टाटाने एचपीएल बरोबर देशभर अनेक शहरात प्रमुख मार्गावर एचपीसीएल रिटेल आउटलेट, पेट्रोल पंपावर इव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी हातमिळवणी केली होती. पुणे मुंबई साठी लोढा ग्रुप बरोबर सहकार्य करार केला गेला आहे तसेच इंडीयन ऑइल, एमजीएल, आयजीएल व अन्य राज्य सरकारांना सक्रीय सहयोग देण्याबद्दल बोलणी केली आहेत असे सांगितले जात आहे.