स्टार्टअप वजीसनीची ‘एन्कोक’ इलेक्ट्रिक हायपरकार सादर


भारतात इलेक्ट्रिक वाहनांना दिले जात असलेले प्रोत्साहन आणि सरकार त्यासाठी देत असलेल्या विविध सवलती मुळे देशात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला मोठी चालना मिळाली आहे. इलेक्ट्रिकल व्हेईकल स्टार्टअप वजीसनीने देशातील सर्वात वेगवान, वजनाला सर्वात हलकी आणि पूर्ण इलेक्ट्रिक कार ‘एन्कोक’ नावाने सादर केली आहे. ही कार भारतीयांना आश्चर्यचकित करेल असा तिचा परफॉर्मन्स असल्याचा दावा कंपनीने केला असून ही सिंगलसिटर कार आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार ही जगातील सर्वाधिक वेगवान इलेक्ट्रिक कार पैकी एक असून तिचे डिझाईन स्पेसशिप प्रमाणे आहे. या कारसाठी नवीन इनोव्हेटीव बॅटरी सोल्युशनचा वापर केला गेला असून हे तंत्रज्ञान डीआयसीओ नावाने ओळखले जाते. यात बॅटरीला कुठल्याच लिक्विड कुलिंगची गरज राहत नाही कारण हे काम थेट हवेकडून केले जाते. कारची बॉडी कार्बन फायबर पासून बनविली गेल्याने कार वजनाला अत्यंत हलकी म्हणजे फक्त ७३८ किलो वजनाची आहे आणि मजबूत सुद्धा आहे. कारची मागची चाके कव्हर केली गेली आहेत.

या कारचे उद्घाटन इंदोर येथे केले गेले आणि नेक्सट्रॅक हायस्पीड वाहन टेस्टिंग सेंटरमध्ये तिच्या चाचण्या घेतल्या गेल्या तेव्हा या कारने ताशी ३०९ किमीचा वेग गाठला. ० ते १०० किमीचा वेग घेण्यास तिला २.५४ सेकंद लागले असे समजते. भारताची पहिली कन्सेप्ट कार शूलच्या प्रोडक्शन व्हर्जनवर एन्कोक बनविली गेली असून युकेच्या गुडवूड फेस्टिव्हल मध्ये ती प्रथम सादर केली गेली होती. ग्राहकांसाठी कंपनी लिमिटेड प्रोडक्शन सिरीज आणू शकते असे सांगितले जात आहे. एन्कोक या शब्दाचा अर्थ ‘दिव्य प्रकाशाचा आरंभ’ असा असून ही कार नवीन युगाचे प्रतिक ठरेल असे कंपनीचे म्हणणे आहे.