बायडेन यांच्या इशाऱ्याला न जुमानता रशियन हॅकर्सचा १४० अमेरिकन कंपन्यांवर हल्ला


रशियन हॅकर्सनी अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच ठेवले असून रविवारी अमेरीकेतील सुमारे १४० कंपन्यांवर सायबर हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. अमेरिकन सायबर तज्ञांनी रशियन गुप्तचर संस्थाकडून मोठ्या सायबर हल्ल्याचा इशारा सरकारी विभाग, कार्पोरेट, कम्प्युटर नेटवर्क क्षेत्र आणि मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांना दिला होता. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार रशियन स्टेट स्पॉन्सर्ड फर्म नोबिलीयनने अमेरिकेतील सुमारे १४० आयटी सप्लाय चेन कंपन्यांना टार्गेट केले आहे. या हल्ल्याचा तपास सुरु आहे.

एक महिन्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियन हॅकर्स कडून अमेरिकन कंपन्यावर केल्या जात असलेल्या सायबर हल्ल्यामुळे रशियावर अनेक प्रतिबंध घातले होते. मात्र हे प्रतिबंध झुगारून रशियन हॅकर्सनी सायबर हल्ल्याचे सत्र सुरूच ठेवल्याचे उघड झाले आहे. मायक्रोसॉफ्टच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नवा हल्ला मोठ्या प्रमाणावर क्लाउड स्टोर डेटावर झाला असला तरी हॅकर्स फार मोठी डेटा चोरी करू शकलेले नाहीत.

यापूर्वी रशियन गुप्तचर एजन्सीने अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी नेटवर्क मध्ये सेंधमारी केली होती. निवडणुकापूर्वी प्रथमच इतक्या मोठ्या पातळीवर सायबर हल्ला केला गेला होता. त्यानंतर तेल पाईपलाईन सप्लाय चेनवर १० मे २०२१ रोजी हल्ला केला गेला आणि त्यामुळे अमेरिकेत आपत्काल घोषणा करावी लागली होती.