राहुल द्रविडच होणार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक !


नवी दिल्ली – रवी शास्त्री यांच्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड होईल होईल आणि या शर्यतीत कोण-कोण आहेत, याचा फैसला आज होणार आहे. दरम्यान बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासह अनेक पदांसाठी अर्ज मागवले होते. त्यापैकी आजची अंतिम तारीख मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची होती. माजी कर्णधार राहुल द्रविड याचे नाव या पदासाठी आघाडीवर होते, परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने कालच केलेल्या वक्तव्यानंतर नेमके काय चालले आहे हेच कळत नव्हते.

मी वृत्तपत्रातूनच राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे वाचत असल्याचे वक्तव्य गांगुलीने केले होते. पण, राहुल द्रविडने मंगळवारी या पदासाठी अर्ज दाखल करून सर्व संभ्रम दूर केला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड याचा एकमेव अर्ज आला असल्यामुळे राहुल द्रविडच मुख्य प्रशिक्षकपद होणे निश्चित मानले जात आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड झाल्यास राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद रिक्त होईल आणि त्या पदासाठी व्ही व्ही एस लक्ष्मण याने अर्ज दाखल केला आहे.

२०१५ ते २०१९ या कालावधीत द्रविडने भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केले आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. २०१८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जिंकली होती.