या रेल्वे स्टेशनवर जाताना हवा व्हिसा


परदेशी प्रवास करताना प्रत्येक नागरिकाला पासपोर्ट आणि त्या त्या संबंधित देशाचा व्हिसा लागतो हे आपल्याला माहिती आहे. पण भारतात एक रेल्वेस्टेशन असेही आहे जेथे जाताना तुम्हाला व्हिसा लागतो. तुम्ही व्हिसा शिवाय येथे प्रवेश केला तर थेट तुरुंगाची हवा खाण्याची वेळ सुद्धा येऊ शकते, हे मात्र अनेकांना माहिती नसेल. व्हिसाची आवश्यकता असलेले हे भारतातले एकमेव रेल्वे स्टेशन असून त्याचे नाव आहे अटारी श्यामसिंह. पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील या रेल्वेस्टेशनवरून थेट पाकिस्तान मध्ये जाता येते. मात्र त्यासाठी तुमच्याकडे पाकिस्तानचा व्हिसा असावा लागतो.

अटारी स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे पूर्ण एसी स्टेशन असून येथूनच समझोता एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखविला जातो. पाकिस्तानी व्हिसा नसेल तर कोणताही भारतीय या स्टेशनवर प्रवेश करू शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव या स्टेशनवर कडक पाळत ठेवली जाते. जागोजागी कॅमेरे बसविले आहेत शिवाय गुप्तचर यंत्रणांची सुद्धा या स्टेशनवर बारीक नजर असते. जर कुणी प्रवासी विना व्हिसा पकडला गेला तर त्वरित कारवाई केली जातेच पण जामीन मिळण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

आणखी विशेष म्हणजे या रेल्वेस्टेशनवर हमाल नाहीत. त्यामुळे कितीही सामान असले तरी तुम्हालाच ते वागवावे लागते. बाकी सुविधा उत्तम आहेत. फूड कोर्ट, एलईडी टीव्हीची सुविधा आहे. समजा काही कारणाने रेल्वे लेट झाली तर दोन्ही देशाची अनेक कागदपत्रे साईन करावी लागतात असेही समजते.