एनसीबी कारवाईप्रकरणी आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार नवाब मलिक


मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एनसीबी कारवाईप्रकरणी आणखी एक गौप्यस्फोट करणार आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून एक पत्र मिळाल्याचा दावा केला आहे. नवाब मलिक यांनी पत्राचा फोटोही ट्विट केला आहे. लवकरच ट्विटरद्वारे या पत्रातील माहिती समोर आणणार असल्याचे नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. नवाब मलिक यांनी पत्राबाबतचे ट्विट करण्यापूर्वी आणखी ट्विट करत लवकरच स्पेशल 26 ची घोषणा करणार असल्याचा इशारा दिला होता. नवाब मलिक यांच्या या दोन ट्विटमुळे आज ते कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता लागली आहे. नवाब मलिक यांनी वारंवार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.


एनसीबीने दोन ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूज प्रकरणात कारवाई करत आर्यन खानसह अन्य 13 जणांना अटक केली होती. ही कारवाई समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात झाली होती. पण, या कारवाईवर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त करत पुरावे जाहीर केले होते. के.सी गोसावी आणि भानुशाली हे लोक कारवाईदरम्यान काय करत होते? असा पहिला प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला होता. त्यानंतर या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले. यातील के. सी. गोसावी विरोधात काही ठिकाणी गुन्ह्याची नोंद आहे. या दोन लोकांची एनसीबीच्या कारवाईमध्ये उपस्थिती कशी ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. वानखेडे यांच्या कारवाईवर नवाब मलिक यांनी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.


दरम्यान प्रसारमाध्यमांसमोर येत मुंबई ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेले प्रभाकर साईल यांनी मोठा गोप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी के. सी गोसावीही उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना सरेंडरसाठी तयार झाला. पुणे पोलिस गोसावीला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. प्रभाकर साईल यांनी असा आरोप केला की, आर्यन खान प्रकरणात गोसावीने शाहरुखसोबत 18 कोटींची डील केली होती. यामधील 8 कोटी वानखेडेंना देण्यात येणार होते.