लखनौ आयपीएल टीम ठरली सर्वात महाग


आयपीएल २०२२ साठी दोन नव्या टीमची घोषणा करण्यात आली असून या दोन टीम लखनौ आणि अहमदाबाद अश्या आहेत. लखनौची टीम आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडी ठरली असून लिलावात संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी ग्रुपने ही टीम ७०९० कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केली आहे. अहमदाबाद टीम आयपीएल मधील दुसरी महागडी टीम बनली असून सीव्हीसी कॅपिटल ग्रुपने ५१६६ कोटी रुपये बोली लावून तिची खरेदी केली आहे.

यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियंस ही महाग टीम होती. त्यावेळी तिची खरेदी ८३९ कोटी रूपयात केली गेली होती. अर्थात आरपीएसजी ग्रूपने २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट टीम खरेदी केलेली होती. ही टीम दोन वर्षे आयपीएल खेळली आणि त्यात एकदा फायनल पर्यंत तिने धडक मारली होती. लखनौ टीमसाठी इकाना हे होम ग्राउंड असेल असे समजते.

या संदर्भात आरपीएसजीचे संजीव गोयंका म्हणाले, आम्ही आयपीएल मध्ये परत येत आहोत याची खुशी आहे. त्यासाठी आम्हाला दीर्घ प्रतीक्षा करावी लागली आहे. आम्ही यासाठी काही योजना आखल्या आहेत. आम्ही लखनौ टीम साठी मोजलेली रक्कम फार मोठी आहे असे अनेकांना वाटत असले तरी आमचे कोणतेही नुकसान होणार नाही याची पूर्ण खात्री आहे. आमच्याकडे नव्या टीम बनविण्याचा अनुभव आहे. पुणे सुपरजायंट टीमची मालकी आमच्याकडे होती.

आयपीएल मध्ये अगोदरच आठ फ्रेंचाईजी आहेत. त्या सर्व टीमचे बेसिक मूल्य एकूण ५४२५ कोटी आहे. त्यातुलनेत लखनौ आणि अहमदाबाद फ्रेंचाईजी खूपच महाग आहेत असे बोलले जात आहे. उत्तर प्रदेश जनतेने त्यांच्या राज्याच्या शहराच्या नावाने प्रथमच आयपीएल टीम बनल्याचा आनंद व्यक्त केला असून त्यामुळे राज्याच्या पर्यटनात वाढ होईल अशी भावना व्यक्त केली आहे.