त्रिपुराच्या माजी राज्यपालांकडून भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांची श्वानाशी तुलना


नवी दिल्ली – सध्या त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलास विजयवर्गीय यांची तुलना तथागत रॉय यांनी श्वानाशी केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. तथागत रॉय यांनी हा फोटो ट्विट करताना पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा व्होडाफोन, अशी कॅप्शन दिली आहे. आपल्या जुन्या जाहिरातींमध्ये व्होडाफोनने श्वानाचा वापर केला होता.


कैलास विजवर्गीय पश्चिम बंगालमध्ये एवढा मोठा पराभव झाल्यानंतरही भाजपचे प्रभारी आहेत याबद्दल एका युजरने म्हटले होते. त्याला उत्तर देताना तथागत रॉय यांनी हा फोटो ट्विट केला. गर्दीतील नेते असणाऱ्या कैलास विजयवर्गीय यांचा अद्याप कोणीही उल्लेख केलेला नाही. वरिष्ठ नेत्यांसोबत असणाऱ्या घनिष्ठ सबंध कदाचित त्यांना वाचवत आहेत. आश्चर्य म्हणजे ते अद्यापही भाजपचे प्रभारी आहेत. कोलकात्यात भाजप अद्यापही दिशाहीन असल्याचे एका युजरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. २९४ पैकी २१३ जागांवर टीएमसीने विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला. भाजप फक्त ७७ जागांवर विजय मिळवू शकला. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासहित कैलास विजयवर्गीय, शिवप्रकाश आणि अरविंद मेनन या पराभवासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या चौघांनी मिळून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा नाव चिखलातून ओढत नेत सर्वात मोठ्या पक्षाची बदनामी केल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तृणमूलमधून येणाऱ्या कचऱ्याला ते सेव्हन स्टार हॉटेलमध्ये बसून तिकीट वाटत असल्याचेही ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.