मानहानीकारक पराभवानंतर होणाऱ्या टीकेवरुन आजी-माजी क्रिकेटपटूंकडून मोहम्मद शमीची पाठराखण


दुबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच आणि हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानकडून झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्माधांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले. पण, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली.

पण प्रत्येक बाबतीत धर्माचे भांडवल करणारी ही वाढती प्रवृत्ती अनेकांना अस्वस्थ आणि व्यथित करणारी ठरत आहे. भारतीय संघ व्यवस्थापन किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून या मुद्दय़ावर कोणतीही प्रतिक्रिया सोमवार रात्रीपर्यंत आलेली नव्हती. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ला पाठिंबा देणारी मुद्रा पुढील सामन्यात शमीसाठी भारतीय संघाने करावी आणि त्याची माफी मागावी असाही सल्ला काही चाहत्यांनी दिला.

पाकिस्तानने दुबई येथे रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्या सामन्यात भारताचा १० गडी राखून मानहानिकारक पराभव केला. शमीने या लढतीत ३.५ षटकांत ४३ धावा दिल्यामुळे काही धर्मांधांनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून जाणूनबुजून अशी कामगिरी केल्याचा आरोप केला. काहींनी तर थेट पाकिस्तानकडून खेळण्याचे सल्ले देतानाच त्याला देशद्रोही असे संबोधले. पण शमीसाठी तत्परतेने पाठिंबाही व्यक्त होऊ लागला.

विख्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वीरेंदर सेहवाग, इरफान पठाण, हरभजन सिंग, यजुवेंद्र चहल, अमोल मुझुमदार, रुद्रप्रताप सिंह; विख्यात समालोचक आणि विश्लेषक हर्ष भोगले, तसेच राहुल गांधी, मोहम्मद ओवेसी असा राजकारण्यांनी शमीची पाठराखण केली आहे. खेळामध्ये धर्माशी निगडित बाबी आणून खेळाडूंना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.