अमेझॉनमधील कर्मचारी त्रासले, ना सुट्ट्या, ना सुरक्षा


जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अमेझॉन मध्ये सारे काही आलबेल नाही याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या असून अमेरिकेत अमेझॉन मध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचारयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हे कर्मचारी कंपनीवर नाराज आहेत. १३.३५ लाख कर्मचारी संख्या असलेल्या अमेझॉन कडून कर्मचाऱ्याच्या सुविधा दुर्लक्षिल्या जात आहेत असे समजे.

करोना काळानंतर या कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा हिशोब झालेला नाही तसेच त्यांच्या सुरक्षेची काळजी सुद्धा कंपनीकडून घेतली गेलेली नाही. कामगार हक्क संघटना आणि काही अमेरिकन खासदारांनी या संदर्भात अमेझॉनवर आरोप केले असून करोनकाळात सुद्धा कर्मचाऱ्यांना सुटी दिली गेली नाही आणि ज्यांनी कामावर येण्यात काही अडचण सांगितली त्यांना कंपनीने दंड ठोठावला असे सांगितले जात आहे. या काळात कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढविले गेले पण त्याचा मोबदला दिला गेला नाही अशीही तक्रार आहे.

चार महिन्यापूर्वी टेनेसी वेअरहाऊस मध्ये काम करणाऱ्या अपंग कर्मचाऱ्याचा विशेष भत्ता अचानक बंद केला गेला तर ओक्लाहोमा वेअरहाऊस मध्ये काम करणाऱ्या तारा जोन्स कंपनीच्या दुर्लक्षामुळे मोठ्या अडचणीत सापडली. तिला नवजात बालक सांभाळ पगार ५४० डॉलर्स ऐवजी ९० डॉलर्स दिला गेला. तिने या संदर्भात कंपनीचे मालक जेफ बेजोस यांना पत्र लिहिले पण उपयोग झाला नाही. अश्या अनेक तक्रारीचा पाढा अमेझॉन मधील कर्मचारी वाचून दाखवू लागले असून योग्य न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत.