‘बार्डो’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली : ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार देऊन आज उपराष्ट्रपती वैकंया नायडू यांनी गौरव केला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासाठी ‘ताजमाल’ तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विज्ञान भवनात 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सुप्रसिद्ध तसेच बहुभाषिक अभिनेता रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी कन्नड, तेलगु, तमिळ, हिंदी, मल्ल्याळम, इंग्लिश, बंगाली या भाषेतील सिनेमांमध्ये अभिनय केलेला आहे. रजनीकांत यांचे मुळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड असून ते कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील मराठी कुटूंबातील आहेत. त्यांची चित्रपट सृष्टीतील कारर्कीद 1975पासून सुरू केली.

अभिनेता मनोज वाजपेयी यांना ‘भोसले’ या हिंदी चित्रपटासाठी तर दक्षिण भारतीय अभिनेता धनुष्य यांना ‘असुरन’ यांना तमिळ चित्रपटासाठी यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील पुरस्कार विभागुन प्रदान करण्यात आला. अभिनेत्री कंगना रणावत यांना ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘बार्डो’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. रितु फिल्मस कट एलएलपीने हा चित्रपट निर्माण केलेला आहे. याच चित्रपटातील ‘रान पेटला…’ या गाण्याच्या गायिका सावनी रवींद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइनचाही पुरस्कार मिळाला आहे. प्रोडक्शन डिसाइन सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.

राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे. हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे. तर टूलाईन स्टूडियो प्रा.लि. यांची निर्मिती आहे.

‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘सुपर डिलक्स’ या तमिळ सिनेमासाठी विजय सेथुपथी यांना सहायक अभिनेता या श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार
‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रियेशन ने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहे. राज प्रीतम मोरे हे या स‍िनेमाचे दिग्दर्शक आहे. सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत ‘होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.

स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार प्रदान
स्पेशल मेन्शन या श्रेणीत सत्य घटनावर आधारित ‘लता भगवान करे’ या मराठी सिनेमात अभिनय करणाऱ्या लता करे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्रीमती करे यांचे पती आजारी होते त्यांच्या आजारपणासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी त्या बारामतीतील मॅरॉथॉनमध्ये धावुन प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या लता करे या आहेत. त्यांच्या या विलक्षण कृतीवरच हा सिनेमा बनविलेला आहे. याच श्रेणीत ‘पिकासो’ या मराठी सिनेमाला सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.

‘त्रिज्या’ या सिनेमाला उत्कृष्ट ऑडीयोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. चित्रपटांवरील उत्कृष्ट समिक्षात्मक पुस्तक या श्रेणीत ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला स्पेशल मेन्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हे पुस्तक अशोक राणे यांनी लिहीले आहे.