देशात काल दिवसभरात 12,428 कोरोनाबाधितांची नोंद, तर 356 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप म्हणावे तसे शमलेले नाही. त्यातच आता देशात आज आठ महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 12,428 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 356 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 15,951 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना संकटाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशातील एकूण तीन कोटी 42 लाख 2 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 55 हजार 68 बाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 83 हजार बाधितांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली आहे. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या दोन लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 63 हजार 816 बाधित अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले होते. ज्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात राज्याला मोठे यश आले. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट होताना दिसत आहे. याच दरम्यान महाराष्ट्रात आज हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांच्या संख्येतही घट पाहायला मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, केवळ 23 हजार 184 रुग्ण महाराष्ट्रात सक्रिय आहेत. ही माहिती राज्यासाठी दिलासादायक आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात राज्यात 889 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, 12 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 1 हजार 586 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 66 लाख 3 हजार 850 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 64 लाख 37 हजार 25 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिक्वव्हरी रेट 97.47 वर पोहचला आहे.