काय असते रेव्ह पार्टी?


मुंबई गोवा क्रुझवर रेव पार्टी मध्ये शाहरुखपुत्र आर्यन खान याला अमली पदार्थ प्रकरणी झालेली अटक, त्याचा जामीन आणि अमली पदार्थ विरोधी पथकावर त्यानिमित्ताने विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेली टीका सध्या देशभर गाजत आहे. सोशल मीडियावर रेव पार्टी प्रचंड प्रमाणवर ट्रेंड होत असून देश विदेशातील रेव पार्ट्या चर्चेत आल्या आहेत. एका रात्रीसाठी लाखो रुपये शिवाय तुरुंगात जाण्याची टांगती तलवार असूनही या रेव पार्ट्यात सामील होण्याचा धोका तरुणाई का पत्करते असा प्रश्न कुणालाही पडेल. मुळात रेव पार्टी म्हणजे नक्की काय याचीही माहिती अनेकांना नाही.

आजकाल तरुण वर्गात नशा करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मुंबई, दिल्ली, खंडाला, पुणे, पुष्कर अश्या ठिकाणी होणाऱ्या रेव पार्ट्यांचे लोण आता हिमाचल मधील मनाली आणि अन्य पर्यटनस्थळापर्यंत पोहोचले आहे. अमली पदार्थ विकणाऱ्यांसाठी ही चांगल्या व्यवसायाची जागा आहे. पण पोलिसांचा ससेमिरा लागू नये म्हणून आजकाल या पार्ट्या शहरातून नाही तर दूजागी, खोल समुद्रात क्रुझवर साजऱ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ड्रग तस्करांना मोठी कमाई करण्याचा हा अड्डा बनला आहे.

भारतात रेव पार्टी, ड्रग घेणारे आणि ड्रग तस्कर यांच्यासाठी सुरक्षित जागा ठरली आहे. वास्तविक रेव पार्टीचा शब्दशः अर्थ मौज मस्ती असा असला तरी त्याला अनैतिक संबंध, ड्रग घेणे असे प्रकार जोडले गेले आहेत. अनेक ठिकाणी रेव पार्टीच्या जागी मुक्त सेक्स साठी हटस सुद्धा उपलब्ध केल्या जातात असे दिसले आहे. कोणताही विधीनिषेध न बाळगता या पार्ट्या मधून मौज मस्ती केली जाते.

या रेव पार्टी मध्ये अनेकदा बंदी असलेले अमली पदार्थ सरार्स विकले जातात. म्युझिक, डांस सोबत अनेक प्रकारच्या नशा केल्या जातात. एनसीबी म्हणजे अमली पदार्थ विरोधी पथक त्याबाबत अधिक सतर्क असल्याने अश्या पार्ट्या प्रथम छोट्या गटापुरत्या मर्यादित ठेवल्या जातात. त्यात प्रत्येकाला सामील होता येत नाही. रेव पार्टीसंदर्भातले निरोप सुद्धा पर्सनली दिले जातात किंवा सोशल मीडियावर कोड शब्दांचा वापर त्यासाठी केला जातो. या पार्ट्यांचे आयोजन गुप्तपणे केले जाते कारण त्यात पोलिसांकडून पकडले जाण्याची भीती नेहमीच असते.