विदर्भात रस्त्यांचे भक्कम जाळे; महत्वाची शहरे नागपूरशी मेट्रोने जोडणार – नितीन गडकरी


अमरावती : श्रीक्षेत्र बहिरम येथे १ किलोमीटर दुतर्फा सेवा रस्त्यासाठी ३५ कोटी, मोझरी येथे वळण रस्त्यासाठी ११५ कोटी निधीबरोबरच मोर्शी, वरूड, चांदूर बाजार येथील बायपास मार्गासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. मेळघाटातील नियोजित रस्तेविकासाचे काम पूर्ण होण्यासाठी व वनविभागाच्या परवानगी आदी प्रलंबित प्रकिया पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

१९४५ कोटी निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार डॉ. रणजीत पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार दादाराव केचे, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रताप अडसड, आमदार रामदास आंबटकर, महापौर चेतन गावंडे आदी उपस्थित होते.

४६४ कोटी निधीतून काटोल- वरुड राष्ट्रीय महामार्ग ४०.४७ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण,२६४ कोटी निधीतून तळेगाव- गोणापूर रा. म. ४३.४० किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, ३८६ कोटीतून नांदगावपेठ मोर्शी ४३ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, ४७२ कोटीतून मोर्शी वरुड पांढुरणा ५२.३९ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण, २६६ कोटी निधीतून अंजनगाव परतवाडा बैतुल ४१.३६ किमी काँक्रिट रस्ता दुपदरीकरण आदी कामांचे लोकार्पण यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले.

त्याचप्रमाणे, ४४.४० कोटींतून अमरावती येथील एनएच ५३ वर वाय जंक्शनवर उड्डाण पूल, ४.९४ कोटी निधीतून रा. मा. क्र. ६ ते तळेगाव ठाकूर ब्राम्हणवाडा रस्त्यावरील पिंगळाई नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम व ४.८६ कोटीतून अमरावती बडनेरा रस्ता सुधारणा, ४.९४ कोटींतून महामार्गाला जोडणाऱ्या रहिमापूर वडनेर गंगाई रस्त्यावर पूल, १९.५५ कोटींतून प्ररामा-१२ ला जोडणारा धानोरा गुरव वाढोणा रस्त्याची सुधारणा, १३.९० कोटींतून रा. मा. क्र. ६ ला जोडणाऱ्या चांदुर बाजार ते सर्जापूर रस्त्यापर्यंत सुधारणा आदी कामांचे भूमीपूजन यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाले.

अकोला ते अमरावती रस्त्याचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, असे सांगून केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, पुढील काळात मिनी मेट्रोद्वारे विदर्भातील शहरे जोडण्याचे नियोजन आहे. नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ,रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासाइतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. विदर्भात अनेक रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, रस्तेविकास करताना ब्रिज कम बंधारा पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सिंचनासाठी स्थानिक स्तरावर पाणी उपलब्ध होणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या कामाचा फायदा झाला आहे. विदर्भाची सर्वात मोठी समस्या सिंचनाची आहे. त्यामुळे सिंचन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी हा अन्नदाता आहे. तो ऊर्जादाता झाला पाहिजे. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला चालना मिळावी. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत.त्यांचा वापर वाढावा. इथेनॉलचे पंप सुरू व्हावेत. त्यामुळे इंधनाचा एक सशक्त व परवडणारा पर्याय उभा राहील. जिल्ह्यातील संत्रा निर्यातीला चालना मिळण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. येथील कापड व संत्रा निर्यातीसाठी वर्धा येथील ड्राय पोर्ट उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यामुळे जिल्ह्यात, विदर्भात अनेक मोठ्या कामांना चालना मिळाली. मार्ग क्र. ४७ हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा, तसेच जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या पातळीवरील प्रलंबित बाबी पूर्ण होण्यासाठी सहकार्य व्हावे, असे निवेदन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.