एनसीबी महासंचालकांकडून समीर वानखेडे यांच्या चौकशीचे आदेश


मुंबई : ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान याच्याकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. यापैकी 8 कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप केला आहे. प्रभाकर साईल यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर एकच खळबळ माजली. यातच आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर घालणारी माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांची दक्षता समिती समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. उद्या मुंबईत समीर वानखेडे यांची चौकशी करणारी समिती दाखल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्याविरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या क्रूझवरून आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर असल्याचा दावा स्वत: प्रभाकर साईल यांनी केला. दरम्यान, आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर त्याचे वडील शाहरूख खानकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. यातील 8 कोटी समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असाही त्यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात तपासात अडथळे निर्माण करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहे. तसेच मला फसवण्यासाठी मुंबई पोलीस माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करू शकते.

मुंबई पोलीस जर अशाप्रकारचे पाऊल उचलते, तर माझ्याविरोधात कोणतीही कारवाई होऊ नये, असेही समीर वानखेडे यांनी म्हटले होते. सोमवारी सत्र न्यायालयात याच याचिकेवर सुनावणी झाली. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी यासंदर्भात कोणताही आदेश देण्यास नकार दिला. दरम्यान, समीर वानखेडे यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली असून मुंबईहून दिल्लीला मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे रवाना झाले आहेत.