माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी कटिबद्ध होवू या – आदित्य ठाकरे


अलिबाग :- निसर्गरम्य माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आज आपण सर्वांनी कटिबद्ध होवू या, असे प्रतिपादन पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुंबई सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि माथेरान नगरपरिषदचे पर्यटन दूत तसेच सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपवनसंरक्षक ठाकरे यांच्यासह माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मनोहर भोईर, श्रीमती रेखा ठाकरे,चंद्रकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, माथेरानमधील शाश्वत विकास करताना स्थानिकांचा प्राथम्याने विचार करून रोजगार निर्मिती करायची आहे. माथेरानचे नैसर्गिक वैभव जतन करण्याची गरज आहे.यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. माथेरान पुनर्जीवित करून माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करायची इच्छा आहे.

या ठिकाणी येताना स्थानिक नागरिकांकडून निवेदने दिली जात होती, त्यात येथील रुग्णालयाविषयी देखील समस्या मांडण्यात आली, याविषयी बोलताना ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या धर्तीवर माथेरान मधील रुग्णालयाचीही सुधारणा करण्याचे काम येत्या काही महिन्यात प्राधान्याने करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी सीएसआर फंड मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केला जाईल.

ठाकरे पुढे म्हणाले, माथेरान शहराचा पर्यावरण पूरक विकास करण्याचा सरकारचा मनोदय असून तो विकास शाश्वत असला पाहिजे आणि स्थानिकांना बरोबर घेऊनच तो विकास साधावयाचा आहे. स्थानिकांना रोजगार देणारा हा शाश्वत विकास माथेरानमध्ये केला जाणार असून नावीन्यपूर्ण उपक्रमांतून रोजगार निर्मिती करण्यावर राज्य सरकार भर देणार आहे.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना माथेरान मध्ये पर्यटक अधिक संख्येने यावेत, यासाठी पर्यटन विभागाने अनेक प्रकल्प आणण्याची गरज होती आणि त्यासाठी पर्यटन विभागाबरोबर नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएकडून अधिक निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री या नात्याने आपण केली असून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाच्या अखत्यारीतील एमटीडीसी च्या रिसॉर्टला गतवैभव देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून होत असलेले हे काम महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन क्षेत्रातील माईल स्टोन ठरत आहे.

पर्यटन मंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री म्हणून आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे मोठे पाठबळ मिळत आहे. यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले.

त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात पर्यटनाचा विकास करताना त्या त्या भागातील पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवून इतर व्यवसायांनाही चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. माथेरान विकास पॅटर्न हा सर्वांसमोर आदर्श मॉडेल असेल, यात शंकाच नाही,असे सांगून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून “स्वप्नातील माथेरान” साठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माथेरान गिरीस्थान नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी यावेळी माथेरानचा खऱ्या अर्थाने विकास उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने सुरू होऊ शकला आहे. माथेरान मधील सिम्पसन टॅंकला पुन्हा जिवंत करण्यासाठी राज्य सरकारने लक्ष देण्याची विनंती त्यांनी केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने “माझी वसुंधरा” हे अभियान पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्मिती केलेल्या घडीपत्रिका,बॅचेस,मानचिन्ह, स्टिकर्स यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माथेरान मधील 100 वर्षे जुन्या असलेल्या व आता नूतनीकरण केलेल्या करसनदास मुळजी वाचनालयाचे लोकार्पण तसेच पालिकेच्या सभागृहाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह असे नाव देण्यात आले असून या सभागृहाचे नामकरण आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालक मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर येथील हॉटेल उषा एस्कॉट च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात माथेरान मधील नऊ विकासकामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये ऑलम्पिया मैदानाचा पुनर्विकास करणे,माथेरान शहरातील मुख्य रस्ता ते लॉर्ड पॉईंट रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते बिग चौक पॉईंट रस्ता विकसित करणे, हॉटेल प्रीती ते हॉटेल पॅनोरमा रस्ता विकसित करणे, क्ले पेव्हर ब्लॉक लावणे, स्लॉटर हाऊसचे नूतनीकरण करणे, पंचशील नगर येथील एमएमआरडीए शौचालयजवळील जागेचे सुशोभीकरण करणे, मुख्य रस्ता ते मंकी पॉईंटकडे जाणारा रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते कोरोनेशन पॉईंट रस्ता विकसित करणे तसेच माथेरान नगरपरिषद हद्दीत बसविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण डस्टबिन चे लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मल्हार पवार आणि आभार प्रदर्शन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माथेरानमधील सर्व लोकप्रतिनिधी, कर्जत प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसिलदार सचिन शेजाळ, तहसिलदार विक्रम देशमुख, महसूल विभागातील इतर अधिकारी कर्मचारी, माथेरानचे पोलीस निरीक्षक बांगर, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी, स्थानिक संस्था, संघटना यांनी अथक परिश्रम घेतले.