फडणवीसांची महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका


नांदेड – काही दिवसांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. फडणवीसांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, कशात महाविकास आघाडीमधील लोक भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यामध्ये ते खात असल्यामुळे सामान्य लोकांची अवस्था वाईट झालेली आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहे, पण त्यांना सरकारने रुपयांची मदत केलेली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे मिळत नाहीत. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम देखील मिळालेली नाही. हे एवढे लबाड आहेत की काहीही झाले तरी केंद्रावर ढकलतात. बायकोने मारले तरी केंद्रानेच मारले असे ते सांगतील, अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आपल्या सरकारच्या काळात त्यांनी किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती हे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत असल्याचे ते म्हणाले.