मानहानीकारक पराभवामुळे बिघडले टीम इंडियाचे गणित


दुबई – टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे निराश झाली आहे. टीम इंडियाच्या मनोबलावर या पराभवामुळे परिणाम झाला असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला प्रचंड घाम गाळावा लागणार आहे. आता यापुढचे आव्हान टीम इंडियासाठी अवघड असण्याची शक्यता आहे. कमकुवत संघही मोठ्या स्पर्धांमध्ये बाजी मारतात. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. येथे कधीही काहीही होऊ शकते. आता टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती घ्यावी लागणार आहे.

स्पर्धेच्या ग्रुप २ मध्ये टीम इंडिया आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि नामिबियाचे संघ आहेत. या ६ संघांपैकी फक्त २ अव्वल संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजेच उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघाला किमान ४-५ सामने जिंकावे लागतील. या व्यतिरिक्त, प्रकरण नेट रनरेटवर देखील अडकू शकते. भारताला आता रविवारी आपला पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. यानंतर ३ नोव्हेंबरला टीम इंडिया अफगाणिस्तानशी भिडेल आणि मग भारत पहिल्या फेरीतून पात्र झालेल्या दोन म्हणजेच स्कॉटलंड आणि नामिबिया संघांशी सामने खेळेल. या दोन संघांविरुद्ध टीम इंडियाला सहज विजय मिळू शकतो, पण उर्वरित संघांविरुद्ध विजयाची शाश्वती वर्तवण्यात येत नाही. फक्त दोनच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळे टीम इंडियाला फक्त त्याचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार नाहीत, तर मोठ्या फरकानेही विजय मिळवावा लागेल अन्यथा विराटसेनेवर उपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेतून बाहेर होण्याची वेळ येईल.

सध्या २ गुणांसह पाकिस्तान गट २ मध्ये अव्वल आहे. १० गडी राखून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताचा सध्या नेट रन रेट -०.९७३ असा आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला आगामी सामन्यांमध्येही धावगती सुधारावी लागणार आहे. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या हातून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण असे असतानाही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता.