अमरावती : येणाऱ्या काळात आरोग्य हेच सर्वोच्च प्राधान्य मानून उत्तम उपचार सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात कमी दरात उपचार उपलब्ध असतात व गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे अशा रुग्णालयात प्रगत व अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी अशा संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गरीबांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयांनी पुढाकार घ्यावा – नितीन गडकरी
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात नागपूर येथील मैत्री संस्थेच्या सहकार्याने ५ कोटी रुपये निधीतून प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार किरण सरनाईक, आमदार दादाराव केचे, महापौर चेतन गावंडे आदी यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, कोविडकाळात प्राणवायूचा व अनेक साधनांचा तुटवडा भासत होता.विदर्भात तर एअर टू ऑक्सिजनची यंत्रणा जवळजवळ नव्हती. गंभीर स्थिती होती. त्यामुळे विविध संस्थांच्या मदतीने शक्य तिथे उपचार सुविधा व साधने मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मैत्री संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्राणवायू प्रकल्प देण्याचे ठरवले. पीडीएमसी रुग्णालयात या प्रकल्पामुळे रोज
६८५ जंबो सिलेंडर ऑक्सिजन निर्माण होणार आहे. याद्वारे रुग्णालयाची गरज पूर्ण होऊन इतर ठिकाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. उपचार, ऑक्सिजन, पैसे या अभावी कुणाचे प्राण जाऊ नयेत, अशी प्रभावी अद्ययावत व सक्षम आरोग्य यंत्रणा सार्वजनिक सेवेतील आरोग्य संस्थांनी निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोनाकाळात लॉकडाऊन ही अपरिहार्यता होती. या निर्णयाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला. या काळात रुग्णसेवेसाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना श्री शिवाजी शिक्षण संस्था, ‘पीडीएमसी’ची मोलाची साथ मिळाली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मोलाची मदत केली. यापुढेही पीडीएमसी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणेसाठी, तसेच कौंडण्यपूर ते पंढरपूर पालखी मार्ग व इतर रस्त्यासाठी केंद्रातर्फे सहाय्य मिळावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
देशमुख म्हणाले की, गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प उभा राहत आहे. पीडीएमसी रुग्णालयाला कर्करोग उपचार यंत्रणा व एमआयआर यंत्रणेसाठी मदत मिळवून द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. खासदार श्रीमती राणा, आमदार श्रीमती खोडके, महापौर गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले.