ड्रग्ज प्रकरणात आज होणार नाही अनन्या पांडेची चौकशी !


मुंबई – आज एनसीबीने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकलेली अभिनेत्री अनन्या पांडे हिला चौकशीसाठी बोलावले होते. पण चौकशीला आज अनन्या हजर राहू शकली नाही. अनन्याला ड्रग्ज प्रकरणात आज सकाळी 11 वाजता एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. एनसीबीने दुपारी 1 वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतर अनन्या आज चौकशीसाठी येणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अनन्याच्या अंधेरी येथील घरी गुरुवारी एनसीबीने छापा टाकत तिला समन्स बजावले होते. त्याच दिवशी तिची चौकशी करण्यात आली होती. अनन्याला शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले असता ती वेळेवर न आल्यामुळे तिला एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी चांगलेच सुनावले होते. आज पुन्हा अनन्याला तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले असता, ती आज एनसीबीच्या चौकशीसाठी हजर राहू शकली नाही. वैयक्तिक कारणांमुळे अनन्या येऊ शकली नसल्याची माहिती मिळत आहे.