जगातील बहुतेक नागरिकांनी सर्वात विश्वासार्ह प्रोफेशन म्हणून डॉक्टर्सना पसंती दिली असून करोना नंतर डॉक्टर प्रोफेशनवरील विश्वास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे असे दिसून आले आहे. आज जगातील प्रत्येक दोन व्यक्ती मधील एक, डॉक्टर हे सर्वाधिक विश्वासार्ह प्रोफेशन असल्याचे सांगते आहे तर नेते मंडळी, वकील, मंत्री हे सर्वात कमी विश्वासार्ह प्रोफेशन मानले जात आहे.
भारतीयांच्या यादीत सर्वात विश्वासार्ह प्रोफेशनमध्ये डॉक्टर, सैन्य, शिक्षक
ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स, फ्रांसच्या इप्सोस नावाच्या कंपनीकडून दरवर्षी असे सर्व्हेक्षण केले जाते. यंदा २८ देशात हे सर्व्हेक्षण केले गेले, त्यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया यांचाही समावेश आहे. या सर्व्हेक्षणात भारतीयांनी भारतीय सेना, वैज्ञानिक, शिक्षक यांच्यावर सर्वाधिक विश्वास दाखविला आहे. जगभरातील नागरिकांनी सरकारी मंत्री, सरकारी कर्मचारी, बँकर्स, पत्रकार, जज्ज, वकील या प्रोफेशनवर सर्वात कमी विश्वास दर्शविला आहे. जगभरतील सर्व नेते एकसारखेच आहेत, नुसती आश्वासने देतात आणि ती पूर्ण व्हायला वर्षोनवर्षे प्रतीक्षा करावी लागते असे मत बहुतेकांनी व्यक्त केले आहे. भारतीयांनी टीव्ही न्यूज अँकर्स बाबत विशेष नाराजी व्यक्त केली असून येथे बातम्यांपेक्षा वादविवाद अधिक असतात आणि बातम्या विश्वासार्ह नसतात असे म्हटले आहे.
बहुतेकांनी डॉक्टर्स, सायंटिस्ट, शिक्षक, आर्म्ड फोर्सेस विश्वासार्ह असल्याचे सांगितले आहे तर पोलीस, जज्ज, वकील, टीव्ही न्यूज अँकर, पुजारी, सरकारी कर्मचारी, राजकीय नेते, पत्रकार, मंत्री विश्वासार्ह नसल्याचे म्हटले आहे. टॉप पाच विश्वासार्ह प्रोफेशन मध्ये डॉक्टर ५४ टक्के, वैज्ञानिक ५१, शिक्षक ४३, आर्म्ड फोर्सेस २२ टक्के पसंती दिली गेली आहे तर सर्वात कमी पसंती नेते ५२ टक्के, मंत्री ३९ टक्के, एग्झीक्युटीव्ह २२, बँकर्स ११ आणि पत्रकार १० टक्के अशी आहे.