भारत-पाक सीमेवरील नागरिकाला अमित शहांनी दिला स्वतःचा मोबाईल नंबर


जम्मू काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या साधेपणा आणि मनमोकळ्या वागणुकीबद्दल तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहा या दौऱ्यात जागोजागी सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. रविवारी सायंकाळी भारत पाक सीमेवर जम्मुशी लागून असलेल्या मकवाल तेथे बीएसएफ पोस्टवरील जवानांशी चर्चा करतानाचा येथील स्थानिक लोकांबरोबर वेळ घालविला. या वेळी शहा यांनी येथील एका व्यक्तीला स्वतःचा मोबाईल नंबर दिला, त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि गरज भासेल तेव्हा कधीही फोन करा असेही सांगितले. या वेळी शहा यांनी खाटेवर बसून गावकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या, चहा घेतला.

या अगोदर एका सार्वजनिक सभेत बोलताना त्यांनी जम्मू काश्मीर मधून दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हत्या रोखण्याचा केंद्र सरकार कसून प्रयत्न करत असल्याचे सांगितले. जम्मू काश्मीर मध्ये आत्तापर्यंत १२ हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे आणि २०२२ अखेरपर्यंत ही गुंतवणूक ५१ हजार कोटींवर नेण्यात येत असल्याचे सांगितले. यातून या भागात किमान ५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत असे समजते. जम्मू काश्मीर पासून लडाख वेगळा करून केंद्रशासित प्रदेश बनविल्यावर गृहमंत्री शहा यांची या भागाला पहिलीच भेट आहे.