आफ्रिका खंडातील ‘या’ देशात मोठे लष्करी बंड; पंतप्रधानांच्या घरात घुसून केले त्यांना नजर कैद


सुदान – सोमवारी लष्करातील काही अधिकाऱ्यांनी सुदानचे पंतप्रधान अबदुल्लाह हामडोक यांना कैद केल्याची माहिती समोर येत आहे. ही बातमी सुदानमधील अल हादत टीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी हे बंड का पुरकारले आहे आणि नक्की या मागील कारण काय आहे याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

इतर कोणत्याही सरकारी किंवा इतर संस्थांनी अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही. रॉयटर्सला मिळालेल्या माहितीनुसार लष्करामधील काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांच्या घराच्या घरी बळजबरीने प्रवेश करत त्यांना ताब्यात घेतल्याचे सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. देशातील इतर मंत्र्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, यात औद्योगिक मंत्री इब्राहिम अल शेख आणि सुदानची राजधानी असणाऱ्या खार्तुमचे राज्यपाल आयमन खलिद यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. लष्कराने इतर अनेक सरकारी पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. असोसिएट प्रेसला सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारच्या प्रवक्त्यांना लष्कराने ताब्यात घेतले आहे.