जगावर घोंगावतोय कोरोना पेक्षाही भयानक विषाणूचा धोका


कोविड १९ ची दहशत अजून संपुष्टात आलेली नाही तोच नव्या विषाणूचा धोका जगावर घोंगावू लागला आहे. हा विषाणू कोंबड्यांच्या माध्यमातून पसरणारा आणि माणसाच्या शरीरात गेल्यास भयानक परिणाम करणारा असल्याचा इशारा दिला गेला आहे. हा बर्ड फ्ल्यूच्या विषाणूचा नवा अवतार असून बर्ड फ्ल्यूचे आठ व्हेरीयंट आत्तापर्यंत समोर आले आहेत. जगातील अनेक पोल्ट्री फार्ममध्ये नव्या बर्ड फ्ल्यू व्हेरीयंटची लक्षणे दिसत असून त्यामुळे घबराट पसरली आहे.

२०१९ च्या अखेरी आलेल्या कोविड १९ चा प्रकोप २०२० मध्ये दिसला पण आता करोना लस आल्यामुळे त्याचा धोका कमी झाला आहे. पण पुन्हा एकदा नवीन विषाणूचे संकट जगावर येताना दिसत आहे. या विषाणूमुळे करोनाला मागे टाकेल अशी परिस्थिती जगात निर्माण होऊ शकते असे अनुमान आहे. याची सुरवात गेल्या वर्षी रशियात लाखो कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या तेव्हापासूनच झाली. या कोंबड्यात एव्हीएन फ्लूची लक्षणे दिसल्याने अनेक पोल्ट्री फार्म बंद केले गेले. हा फ्ल्यू माणसात कोविड पेक्षा अधिक वेगाने फैलावतो असा दावा केला जात आहे.

या स्ट्रेनला एच ५ एन ८ असे नाव दिले गेले आहे. रशियात पोल्ट्री मध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या मध्ये या रोगाची लक्षणे दिसताच ९ लाख कोंबड्या मारल्या गेल्या आणि रशियाने ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेला कळविली होती. मात्र त्यावेळी जागतिक आरोग्य संघटना कोविड मध्ये गुंतलेली असल्याने त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नव्हते असे समजते. रशियन फेडरेशन चीफ कंझ्युमर कन्सल्टंट अॅना पोपोवा यांनी त्यावेळीच या विषाणूवर सुद्धा लस तयार केली जावी अशी मागणी केली होती. या विषाणूचे आत्तापर्यंत ८ व्हेरीयंट सापडले आहेत.

गेल्याच आठवड्यात चीन मध्ये एच ५ एन ८ विषाणूची लागण ४८ लोकांना झाल्याचे समोर आले असून या सर्व बाधितांवर गुप्तपणे उपचार केले गेले आणि त्यातील निम्मे रुग्ण मृत्यूमुखी पडल्याचा दावा केला जात आहे. हे सर्व लोक पोल्ट्रीमध्ये काम करणारे होते असेही सांगितले जात आहे. त्यापाठोपाठ युके मध्ये सुद्धा बर्ड फ्ल्यू फैलावण्याची शक्यता असून तेथेही पोल्ट्री फार्म वर बारीक नजर ठेवली जात आहे असे समजते.