27 ऑक्टोबरला ऐतिहासिक ‘श्रीनगर लँडिंग’ लागू करणार भारतीय लष्कर


नवी दिल्ली : 1947 साली 27 ऑक्टोबर या दिवशी भारतीय लष्कराने श्रीनगरमध्ये उतरून पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला मुक्त केले होते. म्हणूनच भारतीय लष्कर दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी ‘इन्फंट्री दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवसाचे औचित्य साधत भारतीय लष्कर 27 ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक ‘श्रीनगर लँडिंग’ लागू करणार आहे. तर दूसरीकडे या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘काश्मीर ब्लॅक डे’ साजरा करण्याची योजना आखत आहे.

श्रीनगर विमानतळावर यंदा भारतीय लष्कर ‘इन्फंट्री दिन’च साजरा तर करणारच आहे, त्याचबरोबर स्काय जंप, हेलिकॉप्टर ऑपरेशन आणि मिग -21 लढाऊ विमानांचे फ्लाय पास्ट देखील होणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तानने काश्मीरवर कब्जा करण्याच्या उद्देशाने मोठा हल्ला केला होता. हा हल्ला मुझफ्फराबाद (आताचे पीओके), उरी, बारामुल्ला, पुंछ आणि नौसेरा सेक्टरमध्ये करण्यात आला होता. या हल्ल्यानंतरच जम्मू-काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी भारतात प्रवेश करण्याचा करार केला आणि भारताची मदत मागितली होती.

भारतीय लष्कराची शीख रेजिमेंट त्यानंतर हवाई दलाच्या विमानाने श्रीनगर विमानतळावर (त्यावेळीचे बडगाम) दाखल झाली. लष्कराने प्रथम पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यापासून हे विमानतळ सुरक्षित केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने सर्व भागातून मुजफ्फराबादकडे पळवून लावले होते, यामुळे संपूर्ण जम्मू-काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचले होते. म्हणूनच भारतीय लष्कर दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी ‘इन्फंट्री दिन’ म्हणून साजरा करते.

तर दूसरीकडे 27 ऑक्टोबरला यंदा पाकिस्तान ‘काश्मीर ब्लॅक डे’ साजरा करणार आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने यासाठी स्वतंत्र निधी देखील दिला आहे. देश-विदेशात राहणाऱ्या पाकिस्तानच्या समर्थकांना सुमारे एक हजार डॉलर्सचा हा निधी देण्यात येणार आहे, जेणेकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅक डेचा प्रचार प्रसार करता यावा. त्याचबरोबर पाकिस्तानने आपल्या सर्व दूतावासांना, उच्चायुक्तांना आणि विदेशातील मिशनला ‘काश्मीर ब्लॅक डे’ करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय आपल्या देशाच्या संसद सदस्यांच्या समितीला 25 ऑक्टोबर रोजी ‘काश्मीर ब्लॅक डे’ साजरा करण्यासाठी देशात आणि परदेशात होणाऱ्या कार्यक्रमांची आणि प्रयत्नांची माहिती देणार आहे.