शिखांच्या पगडीच्या विविध रंगांचे असे आहेत अर्थ


भारतात विविध राज्यात विविध प्रकारच्या पगड्या, टोप्या, पागोटी वापरली जातात. शीख समुदायाची पगडी त्यात विशेष मानली पाहिजे कारण त्याचा शीख धर्माशी जसा संबंध आहे तसेच पगडीच्या विविध रंगांचे वेगळे अर्थही आहेत. हे रंग काही विशेष कारणाने वापरले जातात. शीख समुदाय विविध प्रसंगी विविध रंगाच्या पगड्या वापरतात त्यामागे काय अर्थ आहे हे येथे समजून घेऊ. शीख समुदायाची पगडी ही खास ओळख आहे.

सरदारको डॉट कॉमवर दिलेल्या माहितीनुसार पगडीचा शीख धर्माशी संबध आहे. शीख समुदायात अनेक पंथ आणि समूह आहे. त्यातील एक आहे खालसा. हा पंथ प्रामुख्याने निळ्या आणि नारंगी रंगाची पगडी वापरतो. याचे कारण हे रंग लढाऊ वृत्तीचे प्रतिक आहे आणि हा समूह स्वतःला लढवय्या समजतो. हा पंथ धर्मरक्षक आहे. पगडीच्या रंगातून मागच्या पिढीच्या बहादुरीचा परिचय आणि जे लढले त्याच्या युद्धांची निशाणी त्यातून प्रतीत होते.

नारंगी रंग बुद्धीमान असल्याचे प्रतिक असून गुरु नानक यांच्या काळापासून हा रंग साहस, ज्ञान, त्याग, ताकद यांचे प्रतिक असून निळ्या रंगाशी तो जोडला गेलेला आहे. हा रंग समाजाला एकजूट करणारा मानला जातो आणि त्यामुळे धार्मिक उत्सव अथवा अन्य सार्वजनिक उत्सवात वापरला जातो.

सफेद पगडी हे शांतीचे आणि माणसातील नकारात्मकता संपविणारे प्रतिक आहे. मोठे बुजुर्ग हा रंग प्रामुख्याने वापरतात. हा रंग शारीरिक पावित्र्याचे प्रतिक आहे तसेच हा रंग माणसाला नवउर्जा देणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा मानला जातो. दुःख व्यक्त करताना अंतिम संस्कारांच्या वेळी सुद्धा हा रंग वापरला जातो. या उलट काळा रंग अहंकाराचा त्याग आणि सेवाभाव दाखविण्याचे प्रतिक आहे. काळ्या रंगाची पगडी वापरणाऱ्या व्यक्तीची जीवनशैली अगदी साधी आहे असे मानले जाते.

गुलाबी आणि लाल हे शुभ आहेत म्हणून या रंगाच्या पगड्या लग्नकार्ये व अन्य शुभ कार्यक्रमात वापरल्या जातात. नवीन सुरवातीचे हे प्रतिक आहे तसेच ताकद, बहादुरीचा परिचय देणारे मानले जाते. सोनेरी रंगाच्या पगडीचे शीख धर्मात विशेष महत्व आहे. हा रंग माणसात विशेष शांती निर्माण करणारा मानला जातो. अमृतसरचे पवित्र सुवर्णमंदिर त्याचे खास उदाहरण आहे. पिवळा रंग आनंद व्यक्त करणारा, सूर्योदयाचा रंग आहे. तो स्वातंत्र, स्वच्छंद आणि खास आनंदाचे प्रतिक म्हणून पिवळी पगडी वापरली जाते.