मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण!


मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा राज ठाकरेंना बरे वाटत नसल्यामुळे पुढे ढकलण्यात आला होता. पण, आता राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे राज ठाकरेंना जाणवत होती. त्यांना ताप देखील आल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचे दोन्ही डोस त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी घेतले आहेत. पण, त्यानंतर देखील त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर पालिकेकडून सॅनिटायझेशन केले जाण्याची शक्यता आहे. घरीच क्वारंटाईन होऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज सकाळीच लीलावती रुग्णालयाला राज ठाकरेंच्या मातोश्रींनी भेट दिली होती. यानंतर त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे दोन्ही डोस राज ठाकरे आणि त्यांच्या आई या दोघांना देण्यात आले आहेत. पण, तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पण, राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना कोरोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान याआधी देखील अनेकदा राज ठाकरेंना विनामास्क पाहिले गेले आहे. अगदी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात जेव्हा राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत होते, तेव्हा बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला देखील राज ठाकरे मास्क न घालताच पोहोचले होते. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राज ठाकरे विनामास्क दिसले होते. त्यावेळी पत्रकारांनी मास्क न घालण्याचे कारण विचारले असता, मी मास्क घालत नसल्याचे राज ठाकरेंनी सांगितले होते.