लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद


लातूर : वादामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक चांगलीच गाजत असून काँग्रेस पक्षाची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सरशी होताना दिसत आहे. पुन्हा काँग्रेसकडेच बँकेची एक हाती सत्ता असणार आहे. 70 उमेदवार 19 जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत मैदानात होते. यावेळी निवडणुकीसाठी 117 अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी केली आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. कारण भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे छाननीमध्ये बाद ठरले. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचे अर्ज देखील बाद ठरले होते. काँग्रेसची निवडणुकीपूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पकड मजबूत होणार हे स्पष्ट होत आहे.

विरोधी उमेदवारांना बेबाकी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे काढताना अनंत अडचणी आल्या. भाजपच्या अनेक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीच्या दिवशीच बाकी भरल्याने बाद ठरवला. उमेदवारी अर्ज सहकार बोर्डाची थकबाकी असल्यासही बाद करण्यात आला आहे.

सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेत भाजपने यावेळी मोर्चेबांधणी केली होती. यावर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात आमदार रमेश कराड बारीक लक्ष ठेवून होते. पण अर्ज सादर केल्यानंतर झालेल्या छाननीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवाराचे अर्ज बाद ठरले आहेत. यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा खून केला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याची तक्रार आम्ही करणार आहोत. तसेच याची तक्रार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात येणार असून यात अर्ज बाद करणाऱ्या सरकारी यंत्रणेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागणार असल्याची माहिती रमेश कराड यांनी दिली आहे.