उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे – मुख्य निवडणूक अधिकारी


नागपूर : उद्योग क्षेत्रात कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी उद्योग संस्थांनी या क्षेत्रात शिबिर घेऊन मतदानाची टक्केवारी वाढेल, याबाबत प्रयत्नशील राहावे, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसिलदार राहूल सारंग उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यांच्या मतदारयादीचे विश्लेषण करण्यात येते. सर्वसामान्यपणे, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी 60 ते 70 टक्के असते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनर्रींक्षण कार्यक्रमातंर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग क्षेत्रात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे मतदानाविषयी जनजागृती करण्यात येवून नवमतदारांना मतदान नोंदणी प्रक्रियेची माहिती जसे छायाचित्र, नाव, आवश्यक कागदपत्रे, आदीची माहिती देवून जनजागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

1 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत उद्योग क्षेत्रात शिबिराचे आयोजन करून नमुना 6, 8 व 14 भरून घ्यावे. या कामात जिल्हा उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

16 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदारयादीचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच नवीन मतदारांची नोंदणी, गावातील लग्न होवून बाहेरगावी गेलेल्या महिलांना यादीतून वगळणे तसेच लग्न होवून गावात आलेल्या महिलांची नोंदणी करणे त्यासोबतच दिव्यांगाची नोंदणी करणे व त्यांना चिन्हांकित करण्याचे काम या शिबिरात करण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्रात मतदार जागृतीसाठी पोस्टर, होर्डींगद्वारे विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच अधिकार आहे, याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूर विभागात मतदार जागृती करून मतदारांची टक्केवारी वाढविण्यावर प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. नवमतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांची नोंदणी करून घेण्यास त्यांनी सांगितले.