तारीख बदलली ! आता या दिवशी रिलीज होणार ‘सत्यमेव जयते २’


चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सत्यमेव जयते २’ सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच बदलण्यात आली आहे. या चित्रपटाच्या रिलीजची बदललेली तारीख जॉन अब्राहमने स्वत: जाहीर केली आहे. राज्यातील चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाल्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटाच्या रिलीजची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

आपल्या इन्स्टाग्रामवर जॉन अब्राहमने स्वत: एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. याद्वारे त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याचे जाहीर केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये तो शर्टलेस असल्याचे पाहायला मिळत आहे. यात त्याने दोन जणांना हातावर उचलल्याचे दिसत आहे. यावेळी जॉन हा पोलिसांच्या वेशात दिसत आहे. तसेच त्याच्या मागे अनेक लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये अशोक स्तंभही पाहायला मिळत आहे.


जॉन अब्राहमने हे मोशन पोस्टर शेअर करतेवेळी एक कॅप्शन देत या चित्रपटाच्या रिलीजची तारीख सांगितली आहे. ‘सत्यमेव जयते २’ येत्या २५ नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चित्रपटगृहात अॅक्शन आणि मनोरंजन पाहायला मिळणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याचे कॅप्शन जॉनने या पोस्टरला दिले आहे.

२६ नोव्हेंबरला जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट रिलीज केला जाणार होता. पण आता त्याची तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आल्यामुळे २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांना सत्यमेव जयते हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मिलाप झवेरी ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग आहे.