D-Mart चे मालक राधाकृष्ण दमानी यांच्या पत्नीने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊननंतर आता कुठे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असतानाच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधील जमीनीच्या किंमतींमध्ये आता मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईपासून जवळच असणाऱ्या अलिबागमधील जमिनींच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यातही बॉलिवूड, उद्योजक आणि गुंतवणूकदारांची ही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारी जागी सध्या हॉट फेव्हरेट रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीसाठी पहिली पसंती ठरत आहे. या ठिकाणी असाच एक मोठा व्यवहार नुकताच पार पडला.

नुकताच अवस येथे समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला, सहा एकरांवर पसरलेला एक आलिशान बंगल्याचा सौदा झाला. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार रिटेल किंग आणि शेअर बाजारामधील गुंतवणुकीचे जाणकार असणारे अब्जाधीश राधाकृष्ण दमानी यांची पत्नी श्रीकांतदेवी यांना एका पारशी कुटुंबाने आपली संपत्ती विकली आहे.

मागील वर्षी दक्षिण मुंबईतील मलबार हिल्समध्ये एक हजार १ कोटींचा बंगला डी-मार्टचे संस्थापक असणारे राधाकृष्ण दमानी यांनी विकत घेतला होता. हा बंगला देशातील सर्वात महाग बंगला असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. राधाकृष्ण यांनी आपले धाकटे बंदू गोपीकिशन दमानींसोबत हा बंगला विकत घेतला. आता दमानी कुटुंबाने अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. २०१५ मध्ये राधाकृष्ण दरमानी यांनी १३८ कोटी रुपयांना रेडिसन ब्लू रिसॉर्ट अॅण्ड स्पा या हॉटेलची मालकी मिळवली होती.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबागमधील दमानी कुटुंबियांची ही दुसरी संपत्ती आहे. दमानी कुटुंबाने यापूर्वी जिराडमध्ये २० एकरांवर पसरलेले एक मोठं फार्म हाऊसही विकत घेतल्याचे सांगितले जाते. सध्या खरेदी केलेला आलिशान बंगला हा मांडवा जेट्टीपासून सहा किलोमीटरवर आहे. या बंगल्याच्या आवारामध्ये अनेक फळझाडे असल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल ८० कोटींना हा बंगला विकला गेला आहे.

मुंबईमधील अति श्रीमंतांपैकी १५० कुटुंबे लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अलिबागमधील आपल्या फार्म हाऊसवर राहत होती. या कुटुंबियांपैकी अनेकजण सोशल नेटवर्किंगवर मोठमोठ्या आकारांच्या बागांमध्ये फिरताना, समुद्र किनाऱ्यावर चालताना आणि स्विमिंग पूलमधील फोटो पोस्ट करत होते. त्यामुळेच आता लॉकडाउननंतर येथे गुंतवणूक करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी समोरुन पुढे येत आहेत. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही दोन महिन्यापूर्वी अलिबागमधील मापगावमध्ये २२ कोटींचे घर खरेदी केले. मुंबई ते मांडवा रो सेवा सुरु झाल्यामुळे मांडव्यातील जमिनींचे भावही ५० टक्क्यांनी वाढले आहेत.