भाजपच्या मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप; कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात राज्यातील मंत्र्याचा सहभाग


मुंबई – रोज नव-नवीन खुलासे मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टी प्रकरणामध्ये होत आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर आरोप केल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांचा १०० टक्के सहभाग कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणामध्ये असून वेळ आल्यानंतर सर्वांची नावे जाहीर करणार असल्याचा इशारा भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कंभोज यांनी दिला आहे. सात ऑक्टोबर रोजी मंदिरे सुरु झाली, मग क्रूझ पार्टीला परवानगी कोणी दिली असा सवालही कंबोज यांनी विचारला आहे.

कोणतेही जहाज आंतरराष्ट्रीय सीमेवरुन समुद्रात आले, तर त्याची परवानगी सरकार देते. तर ही परवानगी कोणी दिली? महाराष्ट्रामध्ये सात तारखेला मंदिरे उघडली. क्रूझपार्टीला दोन तारखेची परवानगी देण्यात आली. या प्रकरणामध्ये हायप्रोफाईल लोक आहेत. मला असे वाटते की हे एक मोठे सिंडिकेट सहभागी आहे. याची चौकशी व्हायला हवी. परवानगी कोणी दिली, किती रुपयांचा व्यवहार झाला? म्हणून मला वाटत आहे की यामध्ये सरकामधील व्यक्ती सामील आहे. त्याची माहिती माझ्याकडे आणि जिथे द्यायची आहे तिथे देईल, असे मोहित कंबोज यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.

मंत्रीमंडळातील ती व्यक्ती असल्याचे ट्विट तुम्ही केले आहे, तर ती व्यक्ती कोण आहे असा सवाल केला असता त्यावर कंबोज यांनी भाष्य केले आहे. मला जिथे माहिती द्यायची आहे, तिथे ती माहिती देणार आहे. कोणतेही क्रूझ विनापरवानगी कोणत्या राज्यात येऊ शकत नाही. त्यासाठी परवानगी घेतली असलेच. २१ तारखेला राज्यातील मॉल, रेस्टॉरंट खुले झाले. धार्मिक स्थळे सात तारखेला खुली झाली. तर क्रूझ पार्टीला परवानगी पाच दिवस आधीच देण्यात आल्यामुळे याच्यामध्ये कोणीतरी हायप्रोफाईल व्यक्ती आहे. याची माहिती माझ्याकडे आहे. माध्यमांना ती देणार असल्याचे मोहित कंबोज म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडे याप्रकरणी तक्रार करून मागणी करणार आहे की, याच्या तपासासाठी समिती नेमण्याची मागणी करणार आहे. नवाब मलिक आरोप करत आहे आधी त्यांनी स्वतःकडे पाहायला हवे, असे कंबोज म्हणाले. कोणत्याही मंत्र्याकडे मी इशारा करत नाही आहे. सरकारमधील अनेक मंत्री यामध्ये असू शकतात. एनसीबीने पार्टीचे आयोजन करणाऱ्यांना सुद्धा अटक केली आहे. त्यामुळे त्यांचे परवानगीसाठी कोणासोबतरी संबंध असतील. मी याची माहिती देईल. मी राज्यपालांकडे नवाब मलिक यांची तक्रार करणार आहे. आपल्या पदाचा वापर करुन ते आरोप करत आहेत आणि आपल्या जावयाला वाचवत असल्याचे कंबोज म्हणाले.