१४ वर्षानंतर काडेपेट्याच्या किंमती झाल्या दुप्पट


महागाई दररोज वाढत चालली असून धान्य, तेले, इंधन, पेट्रोल डिझेल अश्या सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचा खिसा हलका होतो आहे. मात्र गेल्या १४ वर्षात ग्राहकांच्या खिशाला अजिबात तोशीस न लावणारी एक वस्तू १ डिसेंबर पासून महाग होणार असून तिच्या किंमती १४ वर्षानंतर दुप्पट होणार आहेत. ही वस्तू दुसरी तिसरी नसून रोजच्या वापरात असलेली काडेपेटी आहे.

आजच्या घडीला १ रुपयात मिळणारी काडेपेटी १ डिसेंबर पासून दोन रुपयांना मिळणार आहे. देशातील पाच प्रमुख काडेपेटी उद्योगांनी सर्वसंमतीने १ डिसेंबर पासून काडेपेटीची एमआरपी २ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. २००७ मध्ये काडेपेटीची किंमत ५० पैसे वरून १ रुपया केली गेली होती आणि आजपर्यंत त्यात बदल झाला नव्हता. पण काडेपेटी साठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्याने आता काडेपेटीच्या किंमती वाढविणे भाग पडले आहे असे सांगितले जात आहे.

शिवकाशी ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसतर्फे दिल्या गेलेल्या माहितीनुसार काडेपेटी बनविण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो. लाल फोस्फरस, मेण, बाहेरच्या बॉक्स बोर्ड, आतील बॉक्स, कागद, पोटेशियम क्लोरेट, सल्फर यांचा त्यात समावेश आहे. या सर्व मालांचे भाव वाढले आहेत. शिवाय डिझेल पेट्रोल दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. तामिळनाडू मध्ये या व्यवसायात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ४ लाख कर्मचारी असून त्यातील ९० टक्के महिला आहेत.

या कामगारांना रोजगार हमी मध्ये अधिक पैसे मिळतात त्यामुळे काडेपेटी कारखान्यातील काम सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कर्मचारी टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान कारखान्यांना पेलावे लागत आहे असेही समजते.